युवराज-योगराज सिंह (Photo Credit: Facebook)

वडिल आणि मुलाचे बंधन अतुलनीय असते. आयुष्यभर टिकणारे हे एक खास नाते असते. वडील आपले पहिले शिक्षक आणि समीक्षक असतात. आपण आजवर पिता-पुत्रांच्या जोडीला अनेक क्षेत्रात सक्रिय पाहिलेले आहेत, मग ते क्रीडा, असो राजकारण किंवा व्यवसाय, पिता-पुत्राच्या जोडीने धमाल केली आहे. क्रिकेटमध्ये (Cricket) देखील आजवर अनेक पिता-पुत्राने आंतरराष्ट्रीय क्रिकेट (Father-Son in International Cricket) गाजवलं आहे. राजकारण, व्यवसाप्रमाणेच क्रिकेटमध्ये अनेक परिवार असे आहेत, ज्यांच्या कुंटूंबातील अनेक सदस्य कोणत्या ना कोणत्या प्रकारे क्रिकेटशी जोडले गेले आहेत. फादर्स डेच्या (Fathers Day) निमित्त आपण या लेखात आपण जे वडिल व मुलगा आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळले आहेत त्यांची माहिती करुन घेणार आहोत. काही आपणास माहित असतीलच पण काही असे आहेत ज्यांच्याबद्दल आपणास फार कमी माहित असेल.

या खेळाडूंसाठीही त्यांचे वडीलच हिरो राहिले आहेत. एकीकडे वडिलांनी यश मिळवले मात्र त्यांच्या मुलांना त्यांच्या यशाची पुनरावृत्ती करता आली नाही. पाहा कोण आहेत ते...

सुनील आणि रोहन गावस्कर 

कसोटी क्रिकेटमध्ये पहिल्यांदा 10 हजार धावा करणारे लिटील मास्टर सुनिल गावसकर यांनी भारताकडून तब्बल 125 कसोटी आणि 108 वनडे सामने खेळले आहेत. आपल्या महान वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवणे रोहनसाठी नक्कीच कठीण होते. रोहनला आपल्या वडिलांप्रमाणे उंची गाठता आली नाही तरी रोहनने 11 वनडे सामने खेळले आणि एक अर्धशतक झळकावले.

विजय-संजय मांजरेकर

जेव्हा भारताकडे कमी वेगवान गोलंदाज असताना विजय मांजरेकर वेगवान गोलंदाजीचा सर्वोत्कृष्ट खेळाडू म्हणून ओळखले जात असायचे. 1952 मध्ये पदार्पणानंतर विजयने देशासाठी 55 कसोटी सामन्यांत 3208 धावा केल्या ज्यामध्ये 7 शतक आणि 15 अर्धशतकांचा समावेश आहे. फलंदाजीच्या जोरावर संजय मांजरेकर उत्तम सुरुवात केली मात्र, नंतर त्यांनी अपेक्षा भंग केली. संजयने भारताकडून 37 कसोटी आणि 74 एकदिवसीय सामने खेळले, ज्यात त्याने अनुक्रमे 2043 आणि 199 धावा केल्या.

इफ्तिखार-मन्सूर अली खान पटौदी

सिनिअर पटौदी नवाब, हे एकमेव खेळाडू आहे ज्यांनी क्रिकेटच्या सर्वात लांब स्वरुपात भारत आणि इंग्लंडचे प्रतिनिधित्व केले आहे. इफ्तिखार, यांनी अ‍ॅशेसमध्ये पदार्पणाच्या सामन्यात शतक ठोकले आणि भारताकडून तीन सामने खेळले. दुसरीकडे, टायगर पटौदी नावाने प्रसिद्ध मन्सूर अली खान यांनी वयाच्या 21 व्या वर्षी कर्णधार म्हणून नियुक्त झाल्यानंतर 40 कसोटी सामन्यात भारताचे नेतृत्व केले. त्यांच्या नेतृत्वात भारताने 1967 मध्ये न्यूझीलंडविरुद्ध पहिली परदेशी कसोटी जिंकली.

रॉजर-स्टुअर्ट बिन्नी

भारतीय संघात राॅजर बिन्नी यांचे वेगळेच स्थान होते. 1983 वर्ल्ड कप विजयाचे ते शिल्पकार होते. त्यांनी एकूण 18 विकेट्स घेतल्या आणि 1985 वर्ल्ड सिरीज चॅंपियनशीप स्पर्धेत त्यांनी 17 विकेट्स घेतल्या होत्या. क्रिकेटमधून निवृत्तीनंतर त्यांनी निवड समिती सदस्य म्हणूनही काम केले. दुसरीकडे, त्यांचा मुलगा स्टुअर्ट बिन्नीच्या नानांवर भारताकडून वनडे डावात सर्वोत्तम कामगिरी करण्याच्या विक्रमाची नोंद आहे. बिन्नी जुनिअरला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये कमी संधी मिळाली आणि त्याने 2016 मध्ये अखेरचा आंतरराष्ट्रीय सामना खेळला.

लाला अमरनाथ-मोहिंदर आणि सुरिंदर अमरनाथ

लाला अमरनाथ, हे स्वातंत्र्यानंतरचे भारताचे पहिले कर्णधार होते. भारताकडून कसोटी क्रिकेटमध्ये पाहिलं शतक करण्याचा मान हा लाला अमरनाथ यांना जातो. त्यांचे थोरले पुत्र सुरिंदर अमरनाथ भारताकडून 10 कसोटी आणि 3 एकदिवसीय सामने खेळले. आणि त्यांचे दुसरे पुत्र मोहिंदर अमरनाथ यांना भारतीय क्रिकेटमधील दिग्गज माजी क्रिकेटपटूंपैकी एक समजले जाते. त्यांनी 69 कसोटी आणि 85 वनडे सामने खेळले. भारताच्या 1983 वर्ल्ड कप विजयात मोहिंदर अमरनाथ मालिकावीर ठरले.

योगराज सिंह आणि युवराज सिंह

आपल्या वडिलांच्या तुलनेत या मुलाने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एक वेगळी यशस्वी कारकीर्द नोंदवली आहे, त्यामुळे या पिता-मुलाची जोडी काही वेगळी आहे. योगराज यांनी भारतासाठी केवळ एक टेस्ट आणि सहा वनडे सामने खेळले असले तरी युवराजने जगातील सर्वात स्फोटक फलंदाज म्हणून प्रसिद्धी मिळवली. युवराजने भारताच्या 2007 टी-20 आणि 2011 वनडे वर्ल्ड कप विजयात महत्वाची भूमिका बजावली.

दरम्यान, आपली आई आपल्यावर प्रेम आणि आपुलकीचा वर्षाव करते, तर आपले वडील आपल्याला मोठ्या वाईट जगात कसे जगायचे हे शिकवतात. आपल्याला आपले आवडते खेळणे विकत घेणे किंवा आपली पहिली बाईक घेणारे ते आपले वडीलच असतात. अमेरिकेत पहिले सोनोरा स्मार्ट डोडने सुरु केलेला, 1910 पासून जूनच्या तिसरी रविवारी फादर्स डे साजरा केला जातो. यंदा 21 जून, रविवारी हा दिवस साजरा केला जाईल.