थंडीच्या दिवसात आईच्या, आजीच्या जुन्या सुती साड्या जोडून शिवलेल्या गोधडीइतके उबदार दुसरे काहीच नाही. आता हीच गोधडी श्रुती दांडेकर (Shruti Dandekar) या मराठमोळ्या महिलेमुळे सातासमुद्रापार गेली आहे. भारताच्या पारंपारिक गोधडीला नव्या रूपात आणाण्याचं काम श्रुती करत आहेत. नुकतील त्यांनी गोधडी स्वरूपातील क्विल्ट (Quilt ) या माध्यमात शिवराज्याभिषेकाचं चित्र साकारलं आहे. यंदा 25-27 जानेवारी रोजी चैन्नई येथे पार पडणार्या India Quilt Festival 2019 मध्ये ते खास आकर्षण ठरणार आहे.
कशी साकारली ही शिवराज्याभिषेकाची प्रतिमा?
19 बाय 8 फीट अशा लांब गोधडी स्वरूपात कापडी तुकड्यांनी शिवराज्याभिषेकाचं चित्र साकारण्यात आलं आहे. यामध्ये सुमारे 20888 कापडी तुकड्यांचा वापर करण्यात आला आहे. तर याकरिता 288 कापडी रंगछटा वापरण्यात आल्या आहेत. कारागिरांना ही कलाकृती जोडण्यासाठी 693 तासांचा वेळ लागला तर सुमारे 41 तास शिवणकाम केल्यानंतर हे चित्र पूर्ण झाले आहे. बाबासाहेर पुरंदरे यांनी या कलाकृतीसाठी मार्गदर्शन केले आहे.
शिवराज्याभिषेक सोहळा शिवाजी महाराजांना 'छत्रपती' शिवाजी महाराज करणारा होता. आजही त्यांच्या कर्तृत्त्वाने मराठी माणसाची छाती अभिमानाने फुलते. त्यांच्या कार्याला 'लार्जर दॅन लाईफ' स्वरूपात साकारण्यासाठी हे चित्र योग्य असल्याची भावना श्रुती दांडेकर सोशल मीडियामध्ये शेअर केली आहे. नुकताच सांगलीमध्ये या कलाकृतीचे अनावरण दिमाखदार स्वरूपात करण्यात आलं आहे.