नेते मंडळी जनता कर्फ्यू (संग्रहित संपादित प्रतिमा)

दिवसेंदिवस देशावरील कोरोना व्हायरसचे (Coronavirus) संकट अधिकच गडद होत चालले आहे. आजमितीस देशातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या 341 झाली आहे. अशात पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी जनता कर्फ्यूची संकल्पना मांडली होती. संपूर्ण देश एक दिवस घरात राहावा असा त्यामागील उद्देश होता, त्यानुसार आज, 22 मार्च रोजी सकाळी 7 ते रात्री 9 पर्यंत देशात जनता कर्फ्यू पाळला जात आहे. यासोबतच, सायंकाळी 5 वाजता लोकांनी टाळ्या व थाळ्या वाजवून या संकटकाळात मदत करणारे डॉक्टर्स, परिचारिका, केंद्र सरकारी कर्मचारी, राज्य सरकारी कर्मचारी, ऑनलाईन फूड सेवा देणारे डिलीव्हरी बॉय, कुरीअरवाले, ज्ञात अज्ञात नागरिक या सर्वांचे आभार मानले आहेत.

कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर 19  मार्च रोजी, पीएम नरेंद्र मोदी यांनी जनतेला संबोधित करत, 22 मार्च रोजी जनता कर्फ्यू पाळावा असे सांगितले होते. या काळात कोणताही नागरिकांनी घराबाहेर पडू नये, घरातच राहावे, समाजात जाऊ नये. जे केवळ अत्यावश्यक सेवा देणारे नागरिक आहेत त्यांनीच घराबाहेर पडावे असे सांगण्यात आले होते. तसेच सायंकाळी 5 वाजता डॉक्टर्स, परिचारिका, केंद्र सरकारी कर्मचारी, राज्य सरकारी कर्मचारी अशा लोकांचे कौतुक करण्यासाठी आणि त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी पाच मिनिटे घराच्या दरवाजात, खिडकीत उभे राहून आभार मानावेत असेही सांगण्यात आले होते.

अशाप्रकारे देशाच्या विविध भागांत लोकांनी अतिशय उत्साहात टाळ्या आणि थाळ्या वाजवून जनता कर्फ्यू यशस्वी करून दाखवला आहे. इतकेच नाही तर शरद पवार, सुप्रिया सुळे, जगन मोहन रेड्डी, जेपी नड्डा अशा अनेक नेत्यांनीदेखील आपल्या परिवारासमवेत टाळ्या, थाळ्या व शंख वाजवून आभार व्यक्त केले आहेत. (हेही वाचा: महाराष्ट्रात जमावबंदी लागू; आज रात्रीपासून राज्यातील एसटी, बस सेवा बंद; फक्त जीवनावश्यकच गोष्टी चालू)

दरम्यान, आज संपूर्ण देशात पहायला मिळालेल्या उत्साहाबद्दल पीएम नरेंद्र मोदी यांनी जनतेचे आभार मानले आहेत. आपल्या ट्वीटमध्ये ते लिहितात, 'कोरोना विषाणूविरूद्ध या लढाईचे नेतृत्व करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचे देश आभार मानत आहे. सर्व देशवासीयांचे खूप आभार.'