Coronavirus: महाराष्ट्रात जमावबंदी लागू; आज रात्रीपासून राज्यातील एसटी, बस सेवा बंद; फक्त जीवनावश्यकच गोष्टी चालू
ST Bus (Image used for representational purpose only) (Photo credits: PTI)

देशातील कोरोना विषाणू (Coronavirus) बाधित रुग्णांची संख्या 340 च्या वर गेली आहे, फक्त महाराष्ट्रातच (Maharashtra) हा आकडा 74 वर पोहचला आहे. अशा परिस्थितीमध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी नुकतेच जनतेला संबोधित केले. उद्धव ठाकरे यांनी दिलेल्या माहितीनुसार आज रात्रीपासून महाराष्ट्रातीत एसटी व बस सेवा (Intercity Bus Services) 31 मार्च पर्यंत बंद ठेवण्यात येणार आहेत. तसेच आज रात्रीपासून संपूर्ण महाराष्ट्रात कलम 144 म्हणजेच जमावबंदी लागू केली जाणार आहे. याचा अर्थ पुढील काही दिवस संपूर्ण महाराष्ट्रात 5 पेक्षा जास्त लोक एकत्र जमू शकणार नाहीत.

यावेळी उद्धव ठाकरे म्हणाले, ‘आजचा जनता कर्फ्यू रात्री 9 वाजेपर्यंत आहे, मात्र हा संयम पहाटेपर्यंत पाळण्याचा प्रयत्न करा. आवश्यकता नसल्यास घराबाहेर पडू नका. उद्यापासूनचे पुढील काही दिवस अतिशय महत्वाचे आहेत. जी जिद्द आज आपण दाखविली, ती पुढे पण दाखवा, ही आपली खरी परीक्षा आहे.’

कोरोना व्हायरसच्या संकटकाळात सरकारने योजलेल्या उपाययोजनांबद्दल माहिती देताना ते म्हणाले, ‘आज रात्रीपासून परदेशी उड्डाणे बंद होत आहेत, एका राज्यातून दुसऱ्या राज्यात जाणाऱ्या ट्रेन्स, बसेस बंद आहेत. आता आपण राज्यातील एसटी व बस सेवाही बंद करत आहोत. सध्या फक्त शहरांतर्गत बससेवा सुरु राहणार आहे, मात्र तीही फक्त जीवनावश्यक गोष्टींसाठीच सुरु राहील.’

(हेही वाचा: 'तुम्ही जेथे असाल तिथेच रहा, पुन्हा दिल्लीला जाण्याचा प्रयत्न करू नका' शरद पवार यांची राष्ट्रवादीच्या खासदारांना सूचना)

या संपूर्ण काळात महाराष्ट्रात फक्त भाजीपाला, दुध, धान्य, औषधे सेवा, वीज पुरवठा कार्यालये, बँक, आर्थिक व्यवहार होणारी केंद्रे चालू राहणार आहे. तसेच आता इथूनपुढे काही दिवस राज्यात फक्त 5 टक्केच लोक ऑफिसमधून कारू शकणार आहेत. यावेळी उद्धव ठाकरे यांनी पूजा-अर्चा चालू ठेवून विविध धर्मांची मंदिरे भाविकांसाठी बंद ठेवण्याचेही आवाहन केले.