Sharad Pawar (Photo Credit: PTI)

संपूर्ण जगाला वेठीस धरणाऱ्या कोरोना व्हायरसने (Coronavirus) भारतातही थैमान घालायला सुरुवात केली आहे. संपूर्ण देशातून महाराष्ट्रात कोरोनाबाधीत रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होऊ लागली आहे. गर्दीमुळे कोरोनाचा संसर्ग वेगाने वाढत असल्याने केंद्राबरोबर राज्यातील सरकारांकडून लोकांना बाहेर न पडण्याचे आवाहन केले जात आहे. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देश वासियांशी संवाद साधताना आज 22 मार्च रोजी जनता संचारबंदी म्हणजेच जनता कर्फ्यू पाळण्याचे आवाहन केले आहे. आज सकाळी 7 वाजल्यापासून सुरुवात झाली असून रात्री 9 वाजेपर्यंत या कर्फ्यूला पाळले जाणार आहे. यातच दिल्ली येथे सुरु असलेले लोकसभेच्या अधिवेशनाला जाऊ नका, असे स्पष्ट आदेश राष्ट्रवादीचे (NCP) अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी लोकसभा आणि राज्यसभा खासदारांना दिला आहे.

सध्या दिल्लीमध्ये लोकसभेचे अधिवेशन सुरु आहे. कोरोनामुळे हे अधिवेशन बंद करण्याची मागणी करण्यात येत होती. मात्र, केंद्र सरकारने अधिवेशन सुरुच ठेवले असून या अधिवेशनाला जाऊ नका, असे शरद पवार यांनी राष्ट्रवादीच्या खासदारांना आदेश दिले आहेत. खासदारांनी दिल्लीला जाऊ नये. त्यापेक्षा महाराष्ट्रात आहात तिथेच थांबा आणि सरकारी यंत्रणांना कोरोनाबाधीत लढण्यासाठी मदत करावी. तसेच लोकांमध्ये जनजागृती करत मदत करावी, असे आवाहन त्यांनी केले आहे. देशात कोरोनाचा वाढता विळखा पाहता आता नागरिकांनी अधिक सज्ज होण्याची वेळ आली आहे. 31 मार्च पर्यंत सरकारने खाजगी संस्था, ऑफिस बंद ठेवण्याचे आवाहन सरकारकडून करण्यात आले आहे. आज संपूर्ण देशभर कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी 'जनता कर्फ्यू'चे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये सकाळी 7 ते रात्री 9 मध्ये नागरिकांना घरीच राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. महत्वाचे म्हणजे, महाराष्ट्रातील मुंबईमध्ये कोरोनाबधितांपैकी आज दुसरा बळी गेला आहे. त्यामुळे देशातील कोरोना बाधितांपैकी मृतांचा आकडा आता 5 वर पोहचला आहे. हे देखील वाचा- 'मुंबई लोकल' सेवा आज मध्यरात्रीपासून बंद; Coronavirus च्या वाढत्या धोक्याच्या पार्श्वभूमीवर सरकारचा निर्णय

शरद पवार यांचे ट्वीट-

करोना विषाणूचा वाढता फैलाव रोखण्यासाठी राज्य सरकारकडून मोठी काळजी घेतली जात आहे. या पार्श्वभूमीवर आज मध्यरात्रीपासून राज्यात कलम 144 लागू करण्यात आल्याची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली आहे. याद्वारे संपूर्ण महाराष्ट्रात लॉकडाऊनची घोषणाच त्यांनी केली आहे.