Fact Check: WHO नुसार अद्याप एकही शाकाहारी व्यक्ती कोविड 19 च्या संसर्गामुळे दगावलेला नाही? असा दावा करणारा मेसेज सोशल मीडियावर व्हायरल; जाणून घ्या सत्य
No Vegetarian Deaths Due to Coronavirus? (Photo Credits: Twitter and File Image)

कोरोना व्हायरसची सध्या जगभरात दहशत आहे. मात्र या काळात अनेक फेक न्यूज, खोटी माहिती डोके वर काढू लागली आहे. तसंच कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी काय करावे, त्यावरील उपचार, कारणे यासंबंधित विविध माहिती सोशल मीडियावर वाचायला मिळते. अशा व्हायरल मेसेजची दिवसाला भर पडते. तसंच कोरोना विषाणूंसंबंधित अनेक अफवा सध्याच्या काळात जोर धरु लागल्या आहेत. त्यातील एक म्हणजे कोरोना व्हायरसची लागण केवळ मांसाहार करणाऱ्यांनाच होते. आतापर्यंत शाकाहार करणाऱ्या एकाही व्यक्तीचा कोरोना संसर्गामुळे मृत्यू झालेला नाही. असा दावा केला जात आहे. कोरोना व्हायरस चीनमधून पसरला असून वटवागुळ खाल्याने याची लागण झाली, अशी माहिती समोर आली होती. शाकाहार आणि मासांहार याबद्दलचा हा दावा सोशल मीडियावर व्हायरल झाल्यावर मार्च महिन्यामध्ये चिकन, अंडी याच्या विक्रीवर मोठा परिणाम झाला होता. आता  त्याच माहितीच्या आधारे हा दावा केला जात आहे.

"जागतिक आरोग्य संघटनेच्या रिपोर्टनसार, एकही शाकाहारी व्यक्ती कोरोना मुळे दगावलेला नाही." असा दावा या झपाट्याने व्हायरल होत असलेल्या मेसेजमध्ये करण्यात आला आहे. हा मेसेज सनातन धर्माचा प्रसार करण्यासाठी वापरला जात आहे. या सारखेच अनेक फेक मेसेजेस व्हायरल होत आहेत. त्यामध्येही शाकाहारी व्यक्ती कोरोना व्हायरसला प्रतिकार करु शकतो, असा दावा करण्यात आला आहे. केवळ सनातन धर्म पाळल्याने आणि शाकाहार केल्याने तुम्ही कोरोना विषाणूंच्या संसर्गापासून मुक्त होऊ शकता. असा दावा सोशल मीडियावर फिरणाऱ्या मेसेजमध्ये केला जात आहे. (Fact Check: मुंबईतील विब्स ब्रेड फॅक्टरी कोरोना व्हायरसच्या प्रकरणानंतर सील?)

सोशल मीडियावर व्हायरल होणारे मेसेजेस:

परंतु, हा मेसेज पूर्णपणे फेक आहे. जागतिक आरोग्य संघटनेने अशाप्रकारचे कोणतेही व्यक्तव्य केलेले नाही. नॉन व्हेज खाल्ल्याने कोरोना व्हायरसचा प्रसार होतो याचा कोणताही पुरावा उपलब्ध नाही. कोरोना व्हायरसचे इंफेक्शन चिकन, मटण किंवा मासे यांच्यातून होतो असा कोणताही दावा WHO ने केलेला नाही. चिकन, मटण आणि मासे यामुळे कोरोना व्हायरसचा फैलाव होतो याचा कोणताही शास्त्रीय पुरावा उपलब्ध नसल्याची माहिती Food Safety and Standards Authority of India (FSSAI) याचे सीईओ यांनी मार्च महिन्यातच दिली होती.