Fact Check: 'व्यवहार करण्यापूर्वी ATM वर दोनदा कॅन्सल बटण दाबल्याने कार्डचा पिन चोरीला जात नाही'; Fake Message व्हायरल, जाणून घ्या सत्य
Viral post falsely attributed to RBI is fake. (Photo Credits: PIBFactCheck/Twitter)

सोशल मीडियावर एक मेसेज मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. एटीएममधून (ATM) व्यवहार करण्यापूर्वी कॅन्सल बटण दोनदा दाबल्याने एटीएम कार्डचा पिन (ATM Card Pin) चोरीला जात नाही, असा दावा या मेसेजमध्ये केला जात आहे. मेसेजची विश्वासार्हता वाढवण्यासाठी त्याबरोबर आरबीआयचे (RBI) नावही जोडले गेले आहे. हा दावा भारतीय रिझर्व्ह बँकेने केल्याचे पोस्टमध्ये म्हटले आहे. परंतु पीआयबीच्या (PIB) तथ्य तपासणीमध्ये हा दावा खोटा असल्याचे आढळून आले आहे.

हा मेसेज व्हॉट्सअॅपवर व्हायरल होत असून, तो 'आरबीआय'ने पाठवला असल्याचा दावा केला जात आहे. इंग्रजीत असलेल्या या मेसेजमध्ये असे लिहिले आहे की, एटीएममधून व्यवहार करण्यापूर्वी दोनदा कॅन्सल बटण दाबा, जेणेकरून जर कोणी तुमचा पिन कोड चोरण्यासाठी कीपॅडशी छेडछाड केली असेल तर ती ठीक होईल. कॅन्सल बटण दोनदा दाबून एटीएम फ्रॉड थांबवता येईल, असा दावा मेसेजमध्ये केला जात आहे.

त्यावर हा दावा खोटा असल्याचे पीआयबीने म्हटले आहे. आरबीआयने असा कोणताही संदेश जारी केलेला नाही, तसेच तुमचे व्यवहार सुरक्षित ठेवण्यासाठी गोपनीयता राखा असे पीआयबीने म्हटले आहे. महत्वाचे म्हणजे असा मेसेज भारतातच नाही तर अमेरिकेतही व्हायरल झाला आहे. हाच मेसेज गेल्या वर्षी अमेरिकेत तिथल्या सेंट्रल बँकेच्या नावाने फिरला होता, पण फॅक्ट चेकिंग वेबसाइट Snopes.com ने तो खोटा ठरवला होता. (हेही वाचा: Fact Check: सैन्य भरती 2022 साठी भारत सरकारकडून वयात 2 वर्षांची सूट? जाणून घ्या व्हायरल मेसेजमागील सत्य)

दरम्यान, सरकारशी संबंधित कोणतीही बातमी खरी आहे की खोटी हे जाणून घेण्यासाठी पीआयबी फॅक्ट चेकची मदत घेतली जाऊ शकते. कोणीही स्क्रीनशॉट, ट्विट, फेसबुक पोस्ट किंवा संशयास्पद बातमीचे URL PIB फॅक्ट चेकला WhatsApp नंबर 918799711259 वर पाठवू शकतो किंवा pibfactcheck@gmail.com वर मेल करू शकतो.