Fact Check: सैन्य भरती 2022 साठी भारत सरकारकडून वयात 2 वर्षांची सूट? जाणून घ्या व्हायरल मेसेजमागील सत्य
Fact Check (संग्रहित संपादित प्रतिमा)

भारतीय सैन्यामध्ये (Indian Army) प्रत्येकाच्या मनात एक वेगळाच आदर आहे. देशातील कित्येक तरुणांचे आर्मीमध्ये भरती होण्याचे स्वप्न असते. तरुणांचा एक मोठा वर्ग सैन्यातील नोकरीसाठी कठोर परिश्रम करताना दिसतो. अशा प्रत्येक तरुणाचे सैन्यात भरती होऊन देशसेवा करण्याचे स्वप्न असते. देशभरातील विविध राज्यांतील तरुण सैन्यात नोकरीसाठी आसुसलेले असतात. त्यामुळेच सैन्यातील भरतीच्या जागा निघताच त्यासाठी लाखो तरुण अर्ज करतात. सध्या सोशल मीडियावर लष्कर भरतीसंदर्भात एक नवीन माहिती व्हायरल होत आहे.

एका टीव्ही वृत्तवाहिनीच्या स्क्रीनशॉटचा हवाला देऊन दावा केला जात आहे की पुढील वर्षी म्हणजेच 2022 मध्ये होणाऱ्या भरतीसाठी अर्जदारांना वयात 2 वर्षांची सूट दिली जात आहे. स्क्रीनशॉटमध्ये लिहिले आहे की, ‘सेना भरती 2022, नवीन नियम, वयात 2 वर्षांची सूट, आर्मी जीडी.’ हा स्क्रीनशॉट व्हॉट्सअॅपवर वेगाने व्हायरल होत आहे.

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला हा स्क्रीनशॉट प्रथमदर्शनी एखाद्या वृत्तवाहिनीवर प्रसारित झालेली बातमी वाटत असला तरी, बारकाईने पाहिल्यास तो एडिट करून तयार करण्यात आल्याचे दिसून येते. सरकारी माहिती एजन्सी पीआयबीच्या तथ्य तपासणी पथकाने या संदेशाची तपासणी केली व त्यांनी ही बातमी किंवा माहिती खोटी असल्याचे सांगितले आहे. PIB ची PIBFactCheck नावाची फॅक्ट चेक विंग आहे, जी चुकीची माहिती, योजना, दिशाभूल करणारी माहिती, तसेच सरकारी विभागांच्या नावाने व्हायरल होणार्‍या अफवांची तपासणी करते.

आता PIB Fact Check ने ट्विट करून या आर्मी भरती नवीन नियमाच्या व्हायरल दाव्याचे सत्य सांगितले आहे. त्यांनी म्हटले आहे की, ‘एका फोटोमध्ये दावा केला आहे की, भारत सरकारने 2022 च्या सैन्य भरतीसाठी वयोमर्यादेत 2 वर्षांची सूट दिली आहे. मात्र हा दावा खोटा आहे. वयोमर्यादेत असा कोणताही बदल केलेला नाही. असा कोणताही खोटा संदेश किंवा फोटो शेअर करू नका.’

दरम्यान, आर्मी रिक्रूटमेंट संबंधित अधिकृत वेबसाइट https://joinindianarmy.nic.in/ वर दिलेल्या माहितीनुसार, आर्मी-GD साठी वयोमर्यादा 17.5 वर्षे ते 21 वर्षे आहे. यासोबतच शैक्षणिक पात्रता 45 टक्के गुणांसह 10 वी उत्तीर्ण होणे आवश्यक आहे. या परीक्षेतील सर्व विषयांमध्ये किमान 33% गुण असणे आवश्यक आहे.