PIB Fact Check (संग्रहित संपादित प्रतिमा)

कोरोना विषाणू (Coronavirus) महामारीशी भारतासह जगातील अनेक देश झगडत आहेत. भारतामध्ये सध्या या विषाणूची दुसरी लाट चालू आहे. या गंभीर आजाराला सर्वजणच घाबरले आहेत व त्यात सोशल मिडियावर व्हायरल होणाऱ्या गोष्टी जनतेला अजूनच घाबरवत आहेत. कोरोना विषाणू व लसीकरणासंबंधी अनेक बाबी व्हायरल होत आहेत ज्यामुळे लोकांची दिशाभूल होत आहे. आताही असाच एक हास्यास्पद व्हिडीओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये दावा केला जात आहे की, कोविड-19 लसीकरणानंतर लसीकरण केलेल्या हातामध्ये वीज (Electricity) निर्माण होते. हा संदेश अनेकांनी पुढे पाठवला आहे, त्यानंतर आता पीआयबी फॅक्ट चेकने (PIB Fact Check) हा दावा पूर्णतः खोटा असल्याचे सांगितले आहे.

व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये दिसत आहे की, एक व्यक्ती हातामध्ये बल्ब घेऊन माहिती देत आहे. या व्यक्तीने कोरोना विषाणू लस घेतल्याचे त्याने सांगितले आहे. तो हातामधील बल्ब शरीराच्या विविध भागांवर लावतो मात्र बल्ब पेटत नाही, ज्याक्षणी तो बल्ब लस घेतलेल्या जागी लावतो त्याक्षणी बल्ब पेटतो. यावरून दावा केला गेला आहे की, लस घेतल्यानंतर शरीरामध्ये वीज निर्माण होते. हा व्हिडीओ अनेकांनी पुढे फॉरवर्ड केला आहे. त्यानंतर पीआयबी फॅक्ट चेकने याची सत्यता पडताळून पहिली व त्यांनी सांगितले आहे की, या व्हिडीओमध्ये कोणतेही तथ्य नाही.

पीआयबी फॅक्ट चेकने एक ट्वीट करत याबाबत माहिती दिली आहे. त्यांनी म्हटले आहे की, ‘सोशल मीडियावर शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये असा दावा केला जात आहे की कोविड-19 च्या लसीकरणानंतर लसीकरण केलेल्या हातामध्ये वीज निर्माण होते. हा दावा बनावट आहे. कोविड लस पूर्णपणे सुरक्षित आहे. अशा खोट्या माहितीवर विश्वास ठेवू नका, लसीकरण करुन घ्या.’ (हेही वाचा: कोरोना लस घेतल्यानंतर 2 वर्षात मृत्यू होणार असल्याचा फ्रांसचे नोबल पुरस्कार विजेते Luc Montagnier यांचा दावा? PIB ने उघडकीस आणले सत्य)

दरम्यान, लसीकरणाबाबत याआधी फ्रेंच नोबेल पुरस्कार विजेते लुस मॉन्टॅग्निअर (French Nobel Laureate Luc Montagnier) यांच्या नावाने दावा केला होता की, लस घेतल्यानंतर 2 वर्षांनी व्यक्तीचा मृत्यू होऊ शकतो. मात्र या दावाही खोटा असल्याचे दिसून आले आहे.