Fact Check: कोरोना लस घेतल्यानंतर 2 वर्षात मृत्यू होणार असल्याचा फ्रांसचे नोबल पुरस्कार विजेते Luc Montagnier यांचा दावा? PIB ने उघडकीस आणले सत्य
Fake Post (Photo Credits: Twitter/PIBFactCheck)

जेव्हापासून जगभरात कोरोना विषाणूने (Coronavirus) थैमान घालायला सुरुवात केली, तेव्हापासून या विषाणूबाबत विविध प्रकारची खोटी माहिती सोशल मिडियावर लोकांचे मनोरंजन करत आहेत. आता जेव्हा अनेक देशांमध्ये लसीकरण सुरु झाले तेव्हा लसीबाबतही अशाच गोष्टी व्हायरल होताना दिसत आहेत. नुकतेच अशीच एक बाब सोशल मिडियावर व्हायरल होत आहे, ज्यामध्ये फ्रेंच नोबेल पुरस्कार विजेते लुस मॉन्टॅग्निअर (French Nobel Laureate Luc Montagnier) यांच्या नावाने दावा केला आहे की, जो कोणी कोरोना लस (COVID-19 Vaccine) घेईल त्याचा मृत्यू होईल. अनेकांनी हा मेसेज वाचून पुढे पाठवला आहे. मात्र आता प्रेस इन्फर्मेशन ब्यूरोच्या (PIB) फॅक्ट चेक टीमने हा व्हायरल मेसेज पूर्णतः खोटा असल्याचे म्हटले आहे.

व्हायरल पोस्टमध्ये म्हटले आहे की, मॉन्टॅग्निअर यांनी एका मुलाखतीमध्ये सांगितले आहे की, लसीकरणानंतर दोन वर्षांतच लस घेतलेल्या लोकांचा मृत्यू होईल. ज्या लोकांनी कोणत्याही प्रकारची लस घेतली आहे, त्यांची जिवंत राहण्याची कोणतीही शक्यता नाही. या जगप्रसिद्ध विषाणूशास्त्रज्ञाच्या नावाने असेही नमूद केले आहे की, ज्यांनी यापूर्वी लस घेतली आहे त्यांच्यावर पुन्हा उपचार होण्याची कोणतीही आशा नाही. या सर्व लोकांचा मृत्यू होणार आहे. (हेही वाचा: Covid-19 विरोधी लस घेतल्याने पुरुष व स्त्रियांमध्ये येऊ शकते वंध्यत्व? जाणून घ्या व्हायरल होत असलेल्या मेसेजमागील सत्य)

आता पीआयबीने ही चुकीची माहिती उघडकीस आणून, आपल्या फॅक्ट चेकमध्ये ही व्हायरल पोस्ट खोटी असल्याचे म्हटले आहे. पीआयबीने पुढे असेही सांगितले की, कोविड-19 लस पूर्णपणे सुरक्षित आहे व अशी चुकीची माहिती सत्यता तपासल्याशिवाय पुढे पाठवू नये असे आवाहन त्यांनी केले आहे.

दरम्यान, देशात कोरोना व्हायरसचा उद्रेक झाल्यापासून या विषाणूशी संबंधित चुकीची आणि दिशाभूल करणारी माहिती सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर मोठ्या प्रमाणात शेअर आणि प्रसारित केली जात आहे. म्हणूनच लोकांना अशा माहितीचे सत्य तपासल्याशिवाय त्यावर विश्वास ठेऊ नये असे सांगितले जात आहे.