Fact Check: Covid-19 विरोधी लस घेतल्याने पुरुष व स्त्रियांमध्ये येऊ शकते वंध्यत्व? जाणून घ्या व्हायरल होत असलेल्या मेसेजमागील सत्य
COVID-19 Vaccinatiion Fake News (Photo Credits: PIB)

कोरोना विषाणू (Coronavirus) साथीच्या विरोधात देशभर लसीकरण (Vaccination) मोहीम युद्धपातळीवर सुरू आहे. या दरम्यान सोशल मीडिया आणि इतर व्यासपीठांवर अनेक दिशाभूल करणारी माहिती शेअर केली जात आहे. यामध्ये कोविड लसीच्या दुष्परिणामांशी संबंधितही अनेक पोस्ट्स व्हायरल होत आहेत, मात्र त्यातील बहुतेक खोट्या आहेत. आता कोविड लसीबाबत एक दावा व्हायरल होत आहे ज्यामध्ये म्हटले आहे की, लसीमुळे महिला आणि पुरुषांमध्ये वंध्यत्व (Infertility) येऊ शकते. अनेकांनी या बातमीची सत्यता न पडताळता ही बातमी पुढे पाठवली आहे. आता प्रेस इन्फर्मेशन ब्यूरोच्या (PIB) फॅक्ट चेक टीमने या व्हायरल मेसेजचे सत्य उघड केले आहे.

1 मे पासून, देशातील 18 वर्षांवरील लोकांसाठी लसीकरण मोहीम सुरू झाली आहे. अशा परिस्थितीत लसीकरणाबाबत अनेक प्रकारचे दावे केले जात आहेत, ज्यामुळे लोकांमध्ये या लसीबाबत संभ्रम निर्माण होता आहे. आता लस घेतल्याने 'वंध्यत्व' येऊ शकते असा दावा समोर आला आहे. यामध्ये असे म्हटले आहे की, कोरोना विषाणू लस महिला आणि पुरुषांमध्ये वंध्यत्वाचे कारण ठरू शकते. पीआयबीने हा दावा पूर्णपणे खोटा असल्याचे सांगत, ही लस शरीरात या प्रकारचा डिसऑर्डर आणत नाही असे म्हटले आहे.

पीआयबीच्या फॅक्ट चेक टीमने आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवर हा दावा फेटाळून लावला आहे. त्यांनी लोकांना असे खोटे संदेश पुढे पाठवू नयेत असे आवाहन केले आहे. पीआयबीने सांगितले आहे की, 'अनेक बनावट बातम्या/संदेश कोविड लसीकरणाशी संबंधित चुकीची माहिती पसरवत आहेत. ही लस पूर्णपणे सुरक्षित आहे आणि त्यामुळे वंध्यत्व येऊ शकेल असा कोणताही वैज्ञानिक पुरावा नाही.’ (हेही वाचा: खोट्या माहितीचे खंडन करणाऱ्या 'पीआयबी फॅक्ट चेक'च्या नावाने बनवली खोटी वेबसाइट; लोकांना जागरूक राहण्याचे आवाहन)

दरम्यान, याधीही असे अनेक खोटे दावे केले होते, त्यातील एक म्हणजे, ज्यांना न्यूमोनिया, दमा किंवा ब्राँकायटिससारखे श्वसनमार्गाचे आजार आहे त्यांनी ही लस घेऊ नये कारण अशा लोकांना मृत्यूचा धोका आहे. मात्र हा दावाही खोटा असल्याचे समोर आले होते.