PIB Fact Check (संग्रहित संपादित प्रतिमा)

डिजिटल क्रांतीच्या या युगात अगदी खेड्या-पाड्यातीलही एखादी गोष्ट काही मिनिटांत सोशल मिडियावर व्हायरल होत आहे. सध्या कोरोना विषाणू साथीदरम्यान तर विविध प्रकारची माहिती मोठ्या प्रमाणावर शेअर केली जात आहे. पण जर ही माहिती बरोबर असेल तर काही हरकत नाही, मात्र ती चुकीची असल्यास, अफवा किंवा लोकांची दिशाभूल करणारी असल्यास खूप मोठा फरक पडू शकतो. गेल्या काही वर्षांपासून आपण पहात आहात की फेसबुक, व्हॉट्सअ‍ॅप, ट्विटर सारख्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर, इतकेच नाही तर काही वृत्तपत्रे, न्यूज वेबसाइट्सवरही खोटी माहिती प्रकाशित/प्रसारित झाली आहे.

आता बनावट बातम्यांबाबत जनतेला जागरूक करणाऱ्या पीआयबी फॅक्टचेकच्या (PIB Fact Check) नावाने एक खोटी वेबसाइट तयार केली आहे. पीआयबीने या संकेतस्थळाबाबत माहिती दिली असून, त्यावर विश्वास न ठेवण्याचे आवाहन केले आहे. बनावट माहितीबद्दल ‘फेक न्यूज’ हा शब्द प्रचलित आहे. जर अशा फेक न्यूज किंवा खोटी माहिती सरकार किंवा सरकारच्या निर्णयाशी संबंधित असेल किंवा ती प्रत्यक्ष वा अप्रत्यक्षपणे सरकारी एजन्सी, मंत्रालय, विभाग किंवा इतर शाखेशी संबंधित असेल, तर सरकारच्या वतीने पीआयबी म्हणजेच प्रेस इन्फर्मेशन ब्युरो याबाबत जनतेलाजागरूक करत असते.

पीआयबी स्वतःच एक फॅक्ट चेक युनिट आहे, जे खोट्या माहितीचे खंडन करत लोकांपर्यंत योग्य माहिती पोहचवण्याचे काम करते. आता आपल्या खोट्या वेबसाईटबाबत माहिती देताना पीआयबी फॅक्टचेकने सांगितले आहे की, http://pibfactcheck.in नावाची वेबसाईट तयार केली आहे, जी पीआयबी फॅक्ट चेकची अधिकृत वेबसाइट असल्याचा दावा करत आहे. मात्र ते खरे नाही. नमूद केलेली वेबसाईट पीआयबीची अधिकृत वेबसाईट नाही. अशा खोट्या वेबसाईटवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन पीआयबीने केले आहे. (हेही वाचा: Fact Check: कोविड-19 लसीचा अभिप्राय घेण्यासाठी येणाऱ्या फोनमुळे मोबाईल हॅक? PIB ने दिले स्पष्टीकरण)

पीआयबीने पुढे म्हटले आहे की, केंद्र सरकारशी संबंधित कोणतीही बनावट माहिती किंवा अफवांबद्दल जाणून घेण्यासाठी ट्विटरवर @PIBFactCheck ला फॉलो करू शकता. तसेच आपण https://pib.gov.in/factcheck.aspx ला भेट देऊ शकता.