Gautam Adani (PC - PTI)

Adani Group: अदानी ग्रुपची सध्या चांगली भरभराट सुरू आहे. कारण नुकतच अदानी ग्रुपला राज्यात वीज पुरवण्याचे कंत्राट मिळाले आहे. त्यामुळे महाराष्ट्रात अदानी ग्रूप पुढचे 25 वर्षे वीज पुरवठा करणार आहे. महाराष्ट्रामध्ये वीजपुरवठा करण्याच्या कंत्राटासाठी लावलेली बोली अदानी ग्रुपने जिंकली आहे. ही बोली जिंकल्यामुळे अदानी ग्रुपला महाराष्ट्राला 6,600 मेगावॅट वीज पुरवण्याचे कंत्राट मिळाले आहे.

अदानी ग्रुपने महाराष्ट्राला 6,600 मेगावॅट रिन्युएबल आणि औष्णिक वीज पुरवण्याची बोली जिंकली आहे. राज्यात वीज पुरवण्याचे कंत्राट मिळवण्यासाठी जेएसडब्ल्यू एनर्जी आणि टोरंट पॉवर या कंपन्या शर्यतीत होत्या. मात्र कमी दर लावून अदानी ग्रुपने हे कंत्राट मिळवले. अदानी ग्रुपकडून 25  वर्षांसाठी औष्णिक आणि सोलार वीजपुरवठ्यासाठी लावलेली बोली महाराष्ट्रातील सध्याच्या वीज खरेदीच्या दरापेक्षा एक रुपयाने स्वस्त आहे. कंपनीने यासाठी 4.08 रुपये प्रति युनिट बोली लावली आणि यासह या ग्रुपने जेएसडब्ल्यू एनर्जी आणि टोरेंट पॉवरला मागे टाकले.

अदानी ग्रुपला लेटर ऑफ इंटेट जारी केल्यानंतर 48 महिन्यांच्या आतमध्ये विजेचा पुरवठा सुरू करावा लागणार आहे. ही बोली जिंकली असली तरी काही नियम आणि अटी ठरल्या आहेत. त्यानुसार,अदानी ग्रुप संपूर्ण कालावधीत 2.70  रुपये प्रति युनिट दराने सौर ऊर्जा पुरवणार आहे. तर औष्णिक विजेचे दर कोळशाच्या किमतीनुसार ठरवले जातील. महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीने मार्च महिन्यात 5 हजार मेगावॅट सोलार विजेसाठी तसेच 1600 मेगावॅट औष्णिक वीज खरेदी करण्यासाठी विशेष निविदा काढली होती.