Tillari Conservation Reserve Area: सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तिलारी परिसर 'संवर्धन राखीव क्षेत्र' म्हणून घोषित
Tillari Conservation Reserve Area (PC - Wikipedia.org)

सिंधुदुर्ग (Sindhudurg) जिल्ह्याच्या दोडामार्ग वन परिक्षेत्रातील 29.53 चौरस किमी क्षेत्र हे 'तिलारी संवर्धन राखीव क्षेत्र' (Tillari Conservation Reserve) म्हणून घोषित करण्यात आले आहे. वन विभागाने मंगळवारी यासंदर्भात अधिसूचना जारी केली आहे. वन विभागाच्या या निर्णयामुळे तिलारी परिसरातील समृद्ध जैवविविधतेचे संवर्धन होणार आहे. तसेच तेथील वन्यजीवांचे रक्षण होण्यास मदत होणार आहे.

या संवर्धन राखीव क्षेत्रामध्ये तिलारी परिसरातील सुमारे 29 चौ.किमी राखीव वनक्षेत्राचा समावेश करण्यात आला आहे. यामध्ये बांबर्डे, घाटिवडे, केंद्रे, केंद्रे बुद्रूक, पाटिये, शिरंगे, कोनाळ, ऐनवडे, हेवाळे आणि मेढे या गावातील राखीव वनक्षेत्राचा समावेश आहे. (हेही वाचा - चंद्रपूर: ताडोबा व्याघ्र प्रकल्प 1 जुलैपासून पर्यटनासाठी होणार खुले)

‘संवर्धन राखीव क्षेत्र’ म्हणून घोषित केलेला तिलारी परिसर हा राज्यातील सातवा कॉरिडोर असणार आहे. तसेच हे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पहिले संवर्धन राखीव क्षेत्र आहे. राज्यात आतापर्यंत एकूण 62 संरक्षित क्षेत्रांची निर्मिती करण्यात आली आहे. यापैकी 13 संरक्षित क्षेत्रे पश्‍चिम घाटात आहेत.

'तिलारी संवर्धन राखीव क्षेत्र' हे महाराष्ट्र, गोवा आणि कर्नाटक या तीन राज्यांच्या सीमेवर स्थित आहे. गोव्यातील म्हादई अभयारण्य, कर्नाटकातील भीमगड अभयारण्य आणि तिलारी राखीव संवर्धन हे तीन क्षेत्र वन्यप्राण्यांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे आहेत. (हेही वाचा - Monsoon Updates 2020: भारताच्या उत्तर, मध्य, ईशान्य भागात 25 ते 28 जून दरम्यान कसा असेल मान्सूनचा प्रवास; पहा IMD चा अंदाज)

दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी फेब्रुवारीमध्ये सिंधुदुर्ग दौऱ्यावेळी घेतलेल्या बैठकीत तिलारी संवर्धन राखीव क्षेत्रासंदर्भात घोषणा केली होती. यावेळी मुख्यमंत्र्यांनी वन्यजीव संवर्धनासाठी राखीव जंगल यासह इको टुरिझमचा प्रकल्पाचा प्रस्ताव तातडीने सादर करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार, आता हे क्षेत्र संवर्धन राखीव म्हणून घोषित झाले आहे. या परिसरात वाघ, हत्ती, बिबट्या, गवा, सांबर, पिसोरी, भेडकी, चौशिंगा आदी वन्यप्राण्यांचा वावर आहे. त्यामुळे विविध प्रकारच्या वनस्पती आणि वन्यजीवांचे रक्षण करण्यासाठी हा परिसर संरक्षित करणे अत्यंत गरजेचे होते.