दक्षिण भारतामध्ये 1 जून दिवशी केरळ पुढे महाराष्ट्रात 11 जूनला मान्सून सक्रिय झाल्यानंतर आता त्याचा प्रवास भारताच्या उत्तर दिशेला होण्यास सुरूवात झाली आहे. दरम्यान सध्या उत्तर भारतामध्ये हवामान खात्याने ऑरेंज अलर्ट दिला आहे. आज (24 जून) हवामान खात्याने 25 ते 28 जून दरम्यानचा देशभरातील मान्सून प्रवासाचा अंदाज वर्तवला आहे. IMD च्या अंदाजानुसार, मान्सुनचा पाउस येत्या काही दिवसांत हिमालयाच्या पायथ्याशी सरकण्याची शक्यता आहे. ईशान्य भारतात मुसळधार पाऊस बरसल्याने पुराची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तर मध्य भारतात या काळात पावसाचे प्रमाण कमी राहण्याची शक्यता आहे. 1 जूनपासून देशभरात जिल्हा पातळीवर पाऊस बरसण्यास सुरूवात झाली असली तरीही उत्तर आणि उत्तर पश्चिम भारतामध्ये काही भागांत मान्सूनची सुरूवात अद्याप झालेली नाही. अशी माहिती हवामान खात्याने दिली आहे.
मुंबई मध्ये ढगाळ तर कधी निरभ्र आकाश राहील. सध्या पुढील 48 तास मुंबईमध्ये अगदीच तुरळक पाऊस बरसण्याची शक्यता आहे. मागील काही दिवसांपासून मुंबई शहर आणि आजुबाजूच्या भागात हलका पाऊस बरसत आहे.
KS Hosalikar Tweet
25 तें 28 जून, मान्सुनचा पाउस हीमालयाच्या पायथ्याशी सरकण्याची शक्यता. इशान्य भारतात मुसळधार, पुराची शक्यता.
मध्य भारतात ह्या दरम्यान पावसाचे प्रमाण कमीची शक्यता. https://t.co/y1T3Ix0SXI
— K S Hosalikar (@Hosalikar_KS) June 24, 2020
दिल्लीमध्ये मात्र हवामान खात्याने ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. 25 जूनला दिल्लीमध्ये मान्सून सक्रिय होण्याची शक्यता आहे. दरम्यान सध्या दिल्लीत पावसाच्या सरी अधून मधून बरसत आहेत. हवामान खात्याच्या माहितीनुसार, पुढील 24 तासांमध्ये उत्तर प्रदेशच्या दिल्ली, पंजाब आणि काही प्रांतात पाऊस बरसेल. तर पुढील 48 तासांत त्याचा जोर कमी होईल.