Rajya Sabha Election 2020: भाजप (BJP) नेते एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांना पुन्हा एकदा पक्षाने कात्रजचा घाट दाखवत राज्यसभा उमेदवारी नाकारली. अर्थात एकनाथ खडसे यांनीही राज्यसभेसाठी दावा केला नाही. तसेच, 'भाजपाकडून मला राज्यसभेसाठी उमेदवारी मिळेल अशी अपेक्षा नव्हती आणि तेच समोर आलं आहे. मला केवळ राज्याच्या राजकारणात रस आहे. त्यामुळे राज्यसभेसाठी जाहीर झालेल्या उमेदवाऱ्यांबाबत कुठलेही आश्चर्य वाटण्याचे कारण नाही' अशी प्रतिक्रिया मात्र त्यांनी दिली. परंतू, एकनाथ खडसे यांचा उमेदवार म्हणून राज्यसभा निवडणुकीसाठी भाजप विचार करत असल्याची जोरदार चर्चा मात्र जोरदार रंगवण्यात आली. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनीही राज्यसभेच्या तिसऱ्या जागेसाठी पक्ष ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांच्या नावाचा विचार करत असल्याचे म्हटले. इतकेच नव्हे तर, एकनाथ खडसे कसे सच्चे स्वयंसेवक आणि पक्ष कार्यकर्ते आहेत. ते पक्ष सांगेल ते ऐकतात वैगेरे वैगेरे... गोष्टीही चंद्रकांत पाटील यांनी बोलून दाखवल्या. मात्र, प्रत्यक्षात काय? तर, एकनाथ खडसे यांचे तिकीट अखेर कापले ते कापलेच. एकूणच प्रकारामुळे एकनाथ खडसे भाजपला खरोखरच नकोसे झालेत किंवा भाजपला ते नकोच आहे का? अशी चर्चा रंगली आहे.
मुख्यमंत्री पदाच्या स्पर्धेतून खडसे बाहेर
एकनाथ खडसे भाजपला नकोच आहे का? असे अशी चर्चा रंगण्यामागे कारणेही तशीच आहेत. भाजप नेते आणि तत्कालीन केंद्रीय कृषीमंत्री गोपीनाथ मुंडे यांचे अपघाती निधन झाले. त्यामुळे महाराष्ट्रात मुख्यमंत्री पदाचा चेहरा कोण याबाबत उत्सुकता निर्माण झाली. अनपेक्षितपणे (पक्षाती रणनितीनुसार) देवेंद्र फडणवीस यांचे नाव समोर आले. हे नाव येईपर्यंत पक्षकार्य आणि ज्येष्ठत्व या मुद्द्यांवरुन एकनाथ खडसे यांचेच नाव मुख्यमंत्रीपदासाठी पुढे येईल अशी जनमानसात चर्चा होती. पण, ऐनवेळी खडसे यांचे नाव मागे पाडले गेले.
शिवसेना-भाजप युती तोडण्याचे खापर खडसेंच्या डोक्यावर
गोपीनाथ मुंडे यांच्या पश्चात लढवत असलेल्या पहिल्याच विधानसभा निवडणूकीत भाजपने शिवसेना या मित्रपक्षासोबतची यूती तोडली. विधानसभा निवडणूक 2014 च्या तोंडावर हा निर्णय जाहीर कसा करायचा याबाबत तेव्हा भाजपमध्ये खलबत सुरु होते. खरे तर मुख्यमंत्री पदाचा चेहरा म्हणून युती तुटल्याचा निर्णय जाहीर करण्याची जबाबदारी देवेंद्र फडणवीस यांची होती. पण, भाजपच्या चाणक्यांनी आणि धुरीणांनी फडणवीस यांना अलगत बाजूला ठेवले. युती तोडत असल्याचा निर्णय एकनाथ खडसे यांच्या तोंडून बाहेर पडेल अशी व्यवस्था केली. त्या पत्रकार परिषदेत भाजपचे अनेक दिग्गज उपस्थित होते. मात्र, प्रसारमाध्यमांसमोर ज्येष्ठ म्हणून हा निर्णय भाजपने एकनाथ खडसे यांनाच जाहीर करायला लावला. त्यामुळे युती तोडण्याचे खापर एकनाथ खडसे यांच्या नावावर फुटले. भाजपचे अनेक चाणक्य मात्र नामानिराळे राहिले.
कार्यासोबत ज्येष्ठत्व असूनही क्रमांक दोनचा नेता नाहीच
विधानसभा निवडणूक (2014) निकाल लागला. भाजप सर्वात मोठा पक्ष ठरला. पण, स्वबळावर सत्ता येऊ शकेल इतपत आकडा भाजपला गाठता आला नाही. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पाठिंब्यावर (आवाजी) भाजपचे अल्पमतातले सरकार सत्तेवर आले. कालांतराने शिवसेना भाजपसोबत सत्तेत सहभागी झाली. या सर्व गदारोळात मंत्रिमंडळ विस्तार झाला. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री म्हणून क्रमांक एकचे नेते राहिले. आता चुरस होती क्रमांक दोनच्या नेते होण्यासाठी. पक्षकार्य आणि ज्येष्ठत्व या दोन्हीमुळे एकनाथ खडसे हेच क्रमांक दोनचे नेते मानले जात. पण, भाजप जनतेत तसा संदेश जाऊ देत नव्हते. कधी चंद्रकांत पाटील, कधी विनोद तावडे तर कधी पंकजा मुंडे असा पाळणा भाजपने झुलवत ठेवला. असे असले तरी, एकनाथ खडसे यांच्याकडे फडणवीस सरकारमध्ये महसूल मंत्री पद आणि त्यासोबतच इतर जवळपास डझनभर खात्यांचा कारभार होता. (हेही वाचा, Rajya Sabha Election 2020: तिसऱ्या जागेसाठी भाजपकडून एकनाथ खडसे यांचा विचार, पहिल्या दोन जागांसाठी रामदास आठवले, उदयनराजे भोसले यांचे नाव निश्चित. )
डझनभर खाती सांभाळणाऱ्या खडसेंना क्लिनचिट नाहीच
दरम्यान, भोसरी येथील भूखंड घोटाळ्याचे निमित्त घडले आणि एकनाथ खडसे यांची विकेट पडली. पारदर्शी कारभार आणि स्वच्छ प्रतिमा म्हणून मिरवणाऱ्या देवेंद्र फडणवीस सरकारच्या मंत्र्याला राजीनामा द्यावा लागला. तोही भूखंड घोटाळा प्रकरणात. पुढे दाऊदच्या पत्नीसोबत फोनवर खडसे यांचे बोलणे झाल्याच्या कथीत प्रकरणाचीही त्यात फोडणी मिळाली. या प्रकरणात पुढे तथ्य नसल्याचे पुढे आले. पण वेळ गेली होती. सर्व वादळ शमल्यावर एकनाथ खडसे यांचे भाजप (देवेंद्र फडणवीस) पुनर्वसन करतील अशी आशा होती. मात्र, शेवटपर्यंत खडसे यांचे पूनर्वसन झालेच नाही. सत्ता असूनही खडसे केवळ आमदार राहिले. विशेष असे की, त्यानंतर फडणवीस यांच्या मंत्रिमंडळातील अनेक मंत्र्यांवर भ्रष्टाचार आणि घोटाळ्याचे आरोप झाले. त्यांना देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री म्हणून स्वत: क्लिनचीट दिली. पण, ही क्लिनचीट खडसे यांच्या वाट्याला कधीच आली नाही. त्याबाबतची उद्विग्नाता विधानसभेतील खडसे यांच्या शेवटच्या भाषणात व्यक्त झाली. (हेही वाचा, भाजपकडून तिसऱ्या जागेसाठी भागवत कराड यांना तर, शिवसेनेकडून प्रियंका चतुर्वेदी यांना राज्यसेभेची उमेदवारी)
खडसे यांचा झाला राजकीय गेम
पुढे सरकारचा कार्यकाळ संपला विधानसभा निवडणूक 2019 जाहीर झाली. विधानसभा निडवणूक 2019 मध्ये तर एकनाथ खडसे यांचा राजकीय गेमच झाला. सुरुवातील भाजपने एकनाथ खडसे यांचे तिकीट कापले. विशेष म्हणजे भाजपने खडसे यांचे तिकीट नेमके कोणत्या कारणामुळे कापले हे आजवर सांगितले नाही. बरीच चर्चा टीका झाल्यानंतर खडसे यांचा मानल्या जाणाऱ्या मुक्ताईनगर विधानसभा मतदारसंघातून त्यांच्या कन्या रोहिणी खडसे यांना भाजपने तिकीट दिले. पण, या निवडणुकीत रोहिणी खडसे यांचा पराभव झाला. जो खडसे यांच्या जिव्हारी लागणे स्वाभाविक होते.
ट्विट
Eknath Khadse should leave BJP now. Otherwise he will be promoted to Margadarshak Mandal of BJP which is equivalent to Forced Retirement. Rajyasabhevar pan pathavala nahi. Hey tar ati zaal aata. #Eknath #Khadse #Eknath Khadse #RajyaSabha #Maharashtra
— Deepak Doddamani (@deepbaazigar) March 12, 2020
पक्षातून डावलणे आणि खडसे यांची उग्विग्नता
विधानसभा निवडणूक 2019 मध्ये तर भाजपने एकनाथ खडसे यांना निवडणूक प्रचारातही फारसे महत्त्व दिले नाही. त्यामुळे पुढे उग्विग्न झालेल्या एकनाथ खडसे यांनी देवेंद्र फडणवीस आणि गिरीश महाजन हे आपले राजकारण संपवण्याच्या विचारात असल्याचा जाहीर आरोप केला. या आरोपावर भाजपतील अनेक ज्येष्ठ नेत्यांनी सावध प्रतिक्रिया दिल्या.
वरील सर्व कारणे, प्रसंग आणि परिस्थिती विचारात घेता भाजपला एकनाथ खडसे खरोखरच नको आहेत का? ही चर्चा अनाठाई वाटत नाही. अर्थात एकनाथ खडसे हे सुद्धा अनेकदा आक्रमक नेते म्हणूनच ओळकले गेले आहेत. देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री असताना विविध खात्यांचा कारभार सांभाळणारे एकनाथ खडसे हे स्वत:च मुख्यमंत्री असल्याच्या अविर्भावात अनेकदा प्रसारमाध्यमांना दिसले आहेत. त्यांच्या अविर्भावातून मुख्यमंत्री पदावर त्यांचा अप्रत्यक्ष दावा नेहमीच दिसून येत असे. जनमताचा पाठिंबा असलेला हा नेता भविष्यात आपल्याला आव्हान देऊ शकेल असे वाटल्यानेच एकनाथ खडसे भाजपमधून डावलले जात असावेत का?