राज्यसभा निवडणूक 2020 (Rajya Sabha Election 2020) साठी भारतीय जनता पक्षाने (BJP) आपली एकूण 9 उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. यात महाराष्ट्रातील दोन उमेदवारांचा समावेश आहे. महाराष्ट्रातून भाजपने केंद्रीय मंत्री आणि आरपीआय अध्यक्ष (आठवले गट) रामदास आठवले (Ramdas Athawale) आणि सातारचे माजी खासदार उदयनराजे भोसले (Udayanraje Bhosale) यांच्या नावाची घोषणा केली आहे. महाराष्ट्रातून भरण्यात येणाऱ्या राज्यसभेच्या तिसऱ्या जागेसाठी भाजप ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांच्या नावाचा विचार करत आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी ही माहिती दिली.
पहिल्या दोन जागांसाठी भाजपने केंद्रीय मंत्री रामदास आठवले आणि माजी खासदार उदयनराजे भोसले यांची नावे जाहीर केली आहेत. तर, तिसऱ्या जागेसाठी पक्ष एकनाथ खडसे यांचा विचार करत आहे, असे चंद्रकांत पाटील यांनी म्हटले आहे. दरम्यान, एकनाथ खडसे हे राज्यसभेसाठी इच्छुक आहेत का? असे विचारले असता, एकनाथ खडसे हे निष्ठावंत कार्यकर्ते आणि स्वयंसेवक आहेत. त्यामुळे पक्षाचा आदेश शक्यतो ते डावलणार नाहीत. एकनाथ खडसे हे पक्ष जे सांगेल ते ऐकतात, असेही चंद्रकांत पाटील यांनी म्हटले आहे.
राज्यसभेच्या रित्क होत असलेल्या एकूण 55 जागांसाठी ही निवडणूक पार पडत आहे. या निवडणुकीत घोषणा निवडणूक आयोगाने 25 फेब्रुवारीलाच केली होती. निवडणूक आयोगाने दिलेल्या माहितीनुसार एकूण 17 राज्यातील 55 राज्यसभा खासदारांचा कार्यकाळ एप्रील 2020 मध्ये संपत आहे. कार्यकाळ समाप्त होत असलेल्या सदस्यांची सर्वाधिक सख्या ही महाराष्ट्रात आहे. महाराष्ट्रात 7, तामिळनाडू 6, पश्चिम बंगाल आणि बिहार प्रत्येकी 5, गुजरात आणि आंध्र प्रदेश, राजस्थान प्रत्येकी 3 यांसह इतरही राज्यांचा समावेश आहे. (हेही वाचा, Rajya Sabha Election 2020: 17 राज्यांतील 55 जागांसाठी 26 मार्चला मतदान; रामदास आठवले, शरद पवार यांच्यासह दिग्गज खासदारांचा कार्यकाळ होतोय समाप्त)
राज्याचे नाव आणि रिक्त होणाऱ्या सदस्यांची संख्या
महाराष्ट्र-7, ओडीसा - 4, पश्चिम बंगाल- 6, आंध्र प्रदेश - 4, तेलंगणा - 2, असाम - 3, बिहार - 5, छत्तीसगढ - 2, गुजरात - 4, हरियाणा - 2, हिमाचल प्रदेश - 1, झारखंड - 2, मध्यप्रदेश - 3, मनिपूर - 1, राजस्थान - 3, मेघालय - 1
एएनआय ट्विट
BJP announces the names of party's candidates for the upcoming election to the Rajya Sabha. https://t.co/sQItPuDotq pic.twitter.com/FAjziadv2Q
— ANI (@ANI) March 11, 2020
राज्यसभा सदस्यत्वाचा कार्यकाळ समाप्त होणाऱ्या सदस्यांमध्ये काही प्रमुख नेत्यांचाही समावेश आहे. यात केंद्रीय मंत्री रामदास आठवले, हरदीप पुरी, दिल्ली भाजपा नेता विजय गोयल, काँग्रेस नेते दिग्विजय सिंह आणि राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष अध्यक्ष शरद पवार यांचाही समावेश आहे. (हेही वाचा, Rajya Sabha Elections 2020: राज्यसभेवर महाराष्ट्रातून कोणाची वर्णी? शरद पवार, रामदास आठवले यांच्यासह उदयनराजे भोसले, किरीट सोमय्या, हंसराज अहीर यांच्यात चूरस)
दरम्यान, एकूण जागांपैकी 9 जागांसाठी भाजपने आपले उमेदवार जाहीर केले आहेत. महाराष्ट्रातील जागांसाठी राष्ट्रवादीकडून पक्षाध्यक्ष शरद पवार आणि फैजिया खान यांना उमेदवारी देण्यात आली आहे. शिवसेना आणि काँग्रेस कोणता चेहरा राज्यसभा निवडणुकीच्या मैदानात उतरवणार याबाबत उत्सुकता आहे.