Rajya Sabha Elections 2020: राज्यसभेवर महाराष्ट्रातून कोणाची वर्णी? शरद पवार, रामदास आठवले यांच्यासह उदयनराजे भोसले, किरीट सोमय्या, हंसराज अहीर यांच्यात चूरस
Rajya Sabha Elections 2020 | (Photo credit: archived, edited, symbolic images)

Rajya Sabha Elections 2020: राज्यसभा या संसदेच्या वरिष्ठ सभागृहातील 7 सदस्यांचा कार्यकाळ लवकरच संपत असल्याने रिक्त जागांसाठी अल्पावधीतच निवडणूक पार पडणार आहे. रिक्त होणाऱ्या या सातही जागांमध्ये महाराष्ट्रातील नेत्यांचा समावेश आहेत. रिक्त होत असलेल्या विद्यमान जागांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून शरद पवार (Sharad Pawar), माजीद मेनन यांचा, भाजपकडून केंद्रीय मंत्री रामदास आठवले (Ramdas Athawale), खासदार अमर साबळे आणि संजय काकडे तर, शिवसेना पक्षाकडून राजकुमार धूत आणि काँग्रेसकडून हुसेन दलवाई यांचा समावेश आहे. त्यामुळे या जागा पुन्हा नव्याने भरल्या जातील तेव्हा त्यात कोणाकोणाचा समावेश असेल याबाबत उत्सुकता आहे.

दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून अध्यक्ष शरद पवार यांचे नाव नक्की आहे. मात्र उर्वरीत 6 जागांसाठी राजकीय पक्षांकडून कोणाची वर्णी लागते याबाबत उत्सुकता आहे. त्यातही एक जागा केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांची आहे. त्यामुळे रामदास आठवले यांना मंत्रीपदावर कायम ठेवायचे तर, भाजपला त्यांना पुन्हा एकदा राज्यसभेवर निवडूण आणावे लागणार आहे. त्यामुळे आठवले यांचीही जागा जवळपास निश्चित समजली जात आहे. मात्र उर्वरीत 5 जागांसाठी कोणत्या नेत्यांना संधी मिळते याबाबत उत्सुकता आहे.

जागा कमी इच्छुक अधिक

राज्यसभा सदस्यत्वासाठी सत्ताधारी भाजप, विरोधात असलेल्या शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस या पक्षांतून इच्छुकांची संख्या मोठ्या प्रमाणावर आहे. या इच्छुकांमध्ये भाजपकडून उदयनराजे भोसले (Udayanraje Bhosale), किरीट सोमय्या, हंसराज अहीर, विजया रहाटकर यांच्या नावांचा समावेश आहे. काँग्रेसकडून सुशील कुमार शिंदे यांच्या नावाचा समावेश आहे. तर, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना या पक्षांकडून कोणाला संधी मिळते याबाबतही उत्सुकता आहे. (हेही वाचा, यवतमाळ: विधानपरिषद पोटनिवडणुकीत भाजपचा पराभव; महाविकास आघाडीचे दुष्यंत चतुर्वेदी विजयी)

दरम्यान, लोकसभा निवडणूकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या तिकीटावर निवडूण येऊनही आपल्या खासदारकीचा राजीनामा देत उदयनराजे भोसले यांनी भाजप प्रवेश केला होता. नंतर झालेल्या पोटनिवडणुकीत उदयनराजे भोसले यांचा पराभव झाला. त्यामुळे भाजप आता उदयनराजे यांचे राज्यसभेवर पुनर्वसन करणार का याबाबत उत्सुकता आहे. दुसऱ्या बाजूला लोकसभा निवडणुकीवेळी किरीट सोमय्या यांना विद्यमान खासदार असतानाही भाजपने तिकीट कापले होते. तर, माजी केंद्रीय मंत्री राहिलेल्या हंसराज अहीर यांचा लोकसभा निवडणुकीत पराभव झाला होता. त्यामुळे या नेत्यांना राज्यसभेवर पुन्हा एकदा संधी देत भाजप पुनर्वसन करु शकते. पण या सर्व शक्यताच आहेत. कारण, विद्यमान खासदारांनाही पुन्हा संधी मिळू शकते असे पक्षातीलच काही मंडळींचा अंदाज आहे. दरम्यान, भाजप युवा मोर्चाच्या विजया रहाटकर यांचाही भाजप इच्छुकांचा समावेश आहे.

दुसऱ्या बाजूला काँग्रेसमधून सुशील कुमार शिंदे यांची राज्यसभेवर निवड होऊ शकते, अशी चर्चा आहे. कार्यकाळ संपत असलेले काँग्रेस खासदार हुसेन दलवाई यांना पक्षाने दोन वेळा संधी दिली आहे. ते गेले 10 वर्षे राज्यसभेवर खासदार आहेत. त्यामुळे पक्ष पुन्हा एकदा तिसऱ्यांदा राज्यसभेवर संधी देईल याची शक्यता कमी आहे. शिवाय महाराष्ट्रात महाविकास आघाडी सरकार सत्तेवर आली तेव्हा काँघ्रेस पक्षातून सुशिलकुमार शिंदे यांच्या कन्या प्रणिती शिंदे यांना मंत्री पदासाठी संधी मिळेल असे मानले जात होते. मात्र, त्यांना मंत्रीपद मिळाले नाही. त्यामुळे सुशील कुमार शिंदे यांना राज्यसभेवर संधी देऊन त्यांची नाराजी दूर केली जाऊ शकते. दरम्यान, राजकुमार धुत यांच्या रुपाने रिक्त होणाऱ्या राज्यसभेच्या जागेवर शिवसेना कोणाला रिंगणात उतरवते याबाबत उत्सुकता आहे.