यवतमाळ विधानपरिषद पोटनिवडणुकीत (Yawatmal Vidhan Parishad By Election) भाजपला धक्का बसला आहे. या निवडणुकीत महाविकास आघाडीचा विजय झाला आहे. शिवसेनेच्या तिकीटावर रिंगणात उतरलेले महाविकास आघाडीचे उमेदवार दुष्यंत चतुर्वेदी (Dushyant Chaturvedi) विजयी झाले आहेत. तसेच या निवडणुकीत भाजपच्या सुमित बाजोरिया यांचा पराभव झाला आहे. या पोटनिवडणुकीत दुष्यंत चतुर्वेदी यांना 298 तर भाजपच्या सुमीत बाजोरिया यांना 187 मतं मिळाली.
दुष्यंत चतुर्वेदी यांच्या विजयामुळे भाजपला पुन्हा एकदा धक्का बसला आहे. दुष्यंत चतुर्वेदी यांचा विजय निश्चित होताच महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी यवतमाळमध्ये जल्लोष केला. 31 जानेवारी ला म्हणजे शुक्रवारी यवतमाळ विधानपरिषद पोटनिवडणुकीसाठी मतदान झालं होतं. या निवडणुकीत विधानसभेप्रमाणेच शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी एकत्र आले होते. त्यामुळे त्यांचा विजय निश्चित असल्याचे बोलले जात होते. (हेही वाचा - 'शट अप कुणाल' या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी कॉमेडियन कुणाल कामराने राज ठाकरेंना दिली वडापावची 'लाच')
यवतमाळ विधान परिषदेमधून आमदार तानाजी सावंत निवडून आले होते. परंतु, तानाजी सावंत विधानसभेवर निवडून गेल्याने येथील जागा रिक्त झाली होती. त्यामुळे या जागेवर पोटनिवडणूक घेण्यात आली होती. आज या पोटनिवडणुकीचा निकाल लागला असून महाविकास आघाडीचा विजय झाला आहे. काही दिवसांपूर्वी दुष्यंत चतुर्वेदी यांनी विधानसभा निवडणुकीपूर्वी शिवसेनेत प्रवेश केला होता. दुष्यंत चतुर्वेदी हे काँग्रेस नेते आणि माजी मंत्री सतीष चतुर्वेदी यांचे चिरंजीव आहेत.