Petrol Diesel Price Hike: पेट्रोल-डिझेल दरवाढीच्या माध्यमातून मोदी सरकारचा जनतेच्या खिशावर दरोडा- बाळासाहेब थोरात
Balasaheb Thorat | (Photo Credits-Twitter)

Fuel Price Hike: आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कच्चा तेलाच्या किमती मोठ्या प्रमाणावर उतरल्या असतानाही केंद्रातील मोदी सरकार पेट्रोल-डिझेल दर वाढवतच आहे. सरकार केवळ अश्वासनच देत आहे. पेट्रोल-डिझेल दरवाढीच्या माध्यमातून मोदी सरकार जनतेच्या खिशावर दरोडा टाकत असल्याचा आरोप काँग्रेस (Congress) प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांनी केला आहे. केंद्र सरकारने खा. राहुल गांधी यांची सामाजीक न्याय योजना तत्काळ लागू करावी अशी मागणीही थोरात यांनी या वेळी केली. ते पुणे येथून बोलत होते. पेट्रोल-डिझेल दरवाढीच्या मुद्द्यावरुन काँग्रेस पक्ष चांगलाच आक्रमक झाला असून, राज्यभर आंदोलन करत आहे.

काँग्रेस पक्षाचे पेट्रोल-डिझेल दरवाढीविरोधात काँग्रेस राज्यातील विविध ठिकाणी आंदोलन करत आहे. कोल्हापूर येथून बोलताना काँग्रेस नेते सतेज पाटील म्हणाले, आगोदरच कोरोना व्हायरस संकट असताना आणि या संकटामुळे सर्वसामान्य माणूस हवालदील झाला आहे. त्यातच केंद्र सरकार पेट्रोल डिझेल दरवाढ करुन सर्वसामान्य नागरिकांचे कंबरडे मोडत आहे. पुढे बोलताना सतेज पाटील यांनी सांगितले की, सध्या कोरोना व्हायरस संकट असल्यामुळे आम्ही थोड्या प्रमाणात आंदोलन करत आहोत. मात्र, कोरोना व्हायरस संकट काहीसे कमी झाल्यानंतर हजारोंच्या संख्येने आम्ही आंदोलन करणार आहोत. (हेही वाचा, 'आता मुंबईकरांनी गाड्या जाळायच्या की चालवायच्या?' इंधन दर वाढीवरुन जितेंद्र आव्हाड यांचा अमिताभ बच्चन यांच्यावर निशाणा)

दरम्यान, काँग्रेस खासदार राजीव सातव यांनीही काँग्रेसचे पेट्रोल डिझेल दरवाढीविरोधातील आंदोलन हे केवळ काँग्रसचे नाही. सर्वसामान्य नागरिकांसाठी हे आंदोलन आहे. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांनी या आंदोलनात मोठ्या प्रमाणावर सहभागी व्हायला हवे, असे अवाहन केले. त्यासोबतच केंद्र सरकार कोरोना व्हायरस, लॉकडाऊन अशा अडचणीच्या काळात नागरिकांना दिलासा द्यायचे सोडून महागाई वाढवून सर्वसामान्यांच्या अडचणीत वाढच करत आहे, असा आरोपही राजीव सातव यांनी केला.