photo credit -x

चिपळूण (Chiplun) मध्ये ऐन मे महिन्यात ढगफूटी सदृश्य पाऊस झाल्याची घटना समोर आली आहे. आज चिपळूण च्या अडरे (Adare), अनारी (Anari) भागामध्ये मुसळधार पाऊस झाल्याने नद्या प्रवाहीत झाल्याचं चित्र आहे. अवघ्या अर्धातासाच्या पावसाने चित्र पालटल्याने या गोष्टीचे व्हिडिओ सध्या वायरल होत आहेत.

एकीकडे वैशाख वणव्याने नागरिकांची उष्णतेने काहिली होत असताना, पाण्यासाठी वणवण होत असताना सह्याद्री भागातील गावात झालेला तुफान पाऊस सध्या चर्चेचा विषय झाला आहे. दरम्यान नदीवर पूल बांधण्यासाठी आणलेले सामान देखील या पाण्यात वाहून गेले आहे. जुलै महिन्यात पडणारा पाऊस यंदा चिपळूणातील गावकर्‍यांनी ऐन मे महिन्यातच अनुभवला आहे. गावातील नद्या या पावसाने दुथडी भरून वाहल्या आहेत.

आजच हवामान खात्याने अंदमानात मान्सून दाखल झाल्याची आनंददायक बाब दिली आहे. आता हा पाऊस केरळ मध्ये 31 मे आणि त्यानंतर आठवडाभरात कोकण किनारपट्टीवर दाखल होऊन महाराष्ट्रात बरसेल असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. मागील वर्षी मान्सून केरळ मध्येच 8 दिवस उशिराने आला होता.

सध्या अधून मधून मान्सून पूर्व पावसाचा शिडकावा होत आहे. राज्यात अनेक ठिकाणी सकाळी कडाक्याचं ऊन आणि संध्याकाळी पाऊस असं चित्र पहायला मिळत आहे.