Monsoon Update: आनंदाची बातमी! मॉन्सून दक्षिण अंदमानमध्ये दाखल, यंदा सरासरी पेक्षा जास्त पावसाचा अंदाज
Rain | Representative image (Photo Credit- Pixabay)

पावसाची चातका प्रमाणे वाट पाहणाऱ्या शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. नैर्ऋत्य मोसमी पाऊस (मॉन्सून) अंदमानात दाखल झाल्याची माहिती हवामान खात्याने रविवारी दिली. उन्हाच्या चटक्यांत होरपळून निघालेल्या आणि पाण्यासाठी दाही दिशा, अशी स्थिती झालेली असताना हवामान खात्याने ही आनंदाची बातमी दिली आहे. गेल्या वर्षी पावसाने ओढ दिल्याने राज्याच्या बहुतांश भागात पाण्याचे दुर्भिक्ष जाणवत आहे. त्यामुळे यंदाच्या मॉन्सूनच्या वाटचालीकडे प्रत्येकाचे डोळे लागले आहेत. या पार्श्वभूमीवर हवामान खात्याने ही दिलासा देणारी बातमी दिली आहे. (हेही वाचा -  Chiplun Rains: चिपळूण मध्ये अडरे गावात ढगफुटी सदृश्य पाऊस; मे महिन्यात अर्धा तासात दुथडी भरून वाहल्या नद्या !)

मॉन्सूनने आज अंदमानच्या दक्षिण भागात हजेरी लावेल, असा अंदाज हवामान खात्याने यापूर्वी दिला होता. त्यानुसार आता मॉन्सूनने तेथे हजेरी लावल्याचे पहायला मिळाले. दक्षिण बंगालचा उपसागर, निकोबार बेटे आणि दक्षिण अंदमान समुद्रात मॉन्सूनने पुढे वाटचाल सुरू केली. अंदमानात दाखल झालेला मॉन्सून केरळमध्ये शुक्रवारपर्यंत दाखल होण्याची शक्यताआहे.

मान्सून अंदमान निकोबारमध्ये दाखल झाल्यानंतर आता त्याची वाटचाल केरळकडे सुरु होणार आहे. अंदमानमधून नैऋत्य मोसमी वाऱ्यांना केरळपर्यंत पोहचण्यासाठी दहा दिवस लागतात. मान्सूनची वाटचाल अशीच राहिली तर 31 मे पर्यंत केरळमध्ये दाखल होणार आहे. मान्सूनपूर्व पाऊस केरळ, तामिळनाडू, पुद्दुचेरी, कराईकल या भागात होणार आहे. 19 आणि 20 मे रोजी या राज्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता असल्याचे हवामान खात्याने म्हटले आहे. त्यामुळे रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. नैऋत्य मान्सून 31 मे रोजी केरळमध्ये पोहोचण्याची शक्यता आहे.