पुण्याच्या हिट अँड रन प्रकरणात दोन जणांचा जीव घेणाऱ्या अल्पवयीन मुलाला जामीन मिळाला आहे. पुण्यातील कल्याणीनगर परिसरात मद्यधुंद अवस्थेत भरधाव कार चालवत त्याने एका दुचाकीला धडक दिली होती. या अपघातामध्ये एक तरुण आणि तरुणीचा मृत्यू झाला होता. या मुलाविरोधात गुन्हा दाखल करत पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं. त्याला कोर्टात हजर करण्यात आले असता जामीन मंजूर झाला आहे. काही अटींवर कोर्टाने त्याला जामीन दिला आहे. पोर्शे कारने दुचाकीला धडक दिल्याने दोन आय टी अभियंत्यांचा मृत्यू झाला. रात्री अडीचच्या सुमारास ही घटना घडली. या अपघातानंतर पळून जाण्याचा प्रयत्न करणाऱ्या चालकाला जमावान चोप देऊन पोलिसांच्या हवाली केलं. (हेही वाचा - Kalyani Nagar Pune Accident: पोर्शे कारच्या धडकेत दुचाकीचा भीषण अपघात, दोघांचा जागीच मृयू, अल्पवयीन चालकावर गुन्हा दाखल)
या पोर्शे गाडीचा चालक पुण्यातील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक आणि ब्रम्हा कॉर्पचे संचालक विशाल अग्रवाल यांच्या मुलगा आहे. तो सतरा वर्षाचा आहे. या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करुन उशीरापर्यंत बार सुरु ठेवणाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल आणि या अपघाताचा तपास मोठ्या स्तरावर केला जाईल, असं अतिरिक्त पोलीस आयुक्त मनोज पाटील यांनी सांगितलं आहे. या प्रकरणी आम्ही 302 चा गुन्हा दाखल केला आहे. त्यासोबतच बाकी चौकशीदेखील करत असल्याचे त्यांनी सांगितले होते.
पुण्यातील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक विशाल अग्रवाल यांचा हा मुलगा असून वेदांत अग्रवाल असे त्याचे नाव आहे. शनिवारी मध्यरात्री वेदांतने आपल्या आलिशान कारने दोघांना चिरडले. कार चालवाताना वेदांत मद्यधुंद अवस्थेत होता. वेदांतने दुचाकीला धडक दिली होती. या दुचाकीवरून जाणाऱ्या अनिस अवधिया आणि अश्विनी कोस्टा यांचा मृत्यू झाला. हे दोघेही राजस्थानचे आहेत. अनिस आणि अश्विनी आपल्या मित्रांसोबत पार्टी करण्यासाठी गेले होते. त्याठिकाणावरून ते दुचाकीवरून आपल्या मित्रांसोबत येरवड्याच्या दिशेला जात होते.