काँग्रेस खासदार राहुल गांधी आणि सपा प्रमुख अखिलेश यादव यांची आज प्रयागराजच्या फूलपूर येथे सभा नियोजित होती. पण, त्यांच्या सभेमध्ये गोंधळ उडाल्यामुळे त्यांना भाषण न करताच तेथून निघावे लागले. या ठिकाणी कार्यकर्ते बॅरिकेड तोडून स्टेजच्या जवळ पोहोचले होते. त्यामुळे परिस्थिती ओळखून भाषण न करताच दोन्ही नेते तेथून निघून गेले. प्रयागराजमध्ये काँग्रेस खासदार राहुल गांधी आणि समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव यांच्या संयुक्त जाहीर सभेत चेंगराचेंगरीसारखी परिस्थिती निर्माण झाली. (हेही वाचा - Arvind Kejriwal भाजपा मुख्यालयाबाहेर आंदोलनासाठी आप नेत्यांसह रवाना (Watch Video))

गर्दी नियंत्रणाबाहेर गेल्यामुळे चेंगराचेंगरी झाल्याची माहिती आहे. यात काहीजण जखमी झाले आहेत. सपा प्रमुख अखिलेश यादव हे जेव्हा व्यासपीठावर पोहोचले तेव्हा कार्यकर्ते नियंत्रणाबाहेर गेले. त्यांनी बॅरिकेट तोडून व्यासपीठावर येण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर इतर नेत्यांच्या सल्ल्याने राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांनी तेथून भाषण न करता निघण्याचा निर्णय घेतला.

पाहा व्हिडिओ -

अखिलेश यादव यावेळी कार्यकर्त्यांना म्हणाले की, 'आम्ही आमचं म्हणणं तुमच्यापुढे ठेवण्यासाठी आलो आहे. आम्हाला कल्पना आहे की, तुम्ही उत्साही आहात. असाच उत्साह तुम्हाला मतदानाच्या दिवसापर्यंत कायम ठेवायचा आहे. मागे देखील मी आलो होते पण मला माझं म्हणणं तुमच्यापुढे मांडण्याची संधी मिळाली नव्हती. तरी तुम्ही सपाला मतदान केलं.'  लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु आहे. एकूण ७ टप्प्यामध्ये देशात मतदान होणार आहे. त्यातील पाचव्या टप्प्यातील मतदान 20 मे रोजी पार पडणार आहे.