
मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील (Mumbai-Pune Expressway) वाहनचालकांसाठी एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. माहितीच्या अधिकारातून (RTI) मिळालेल्या माहितीनुसार, जानेवारी 2023 ते डिसेंबर 2024 या कालावधीत सुमारे 6.24 लाख वाहनांना ‘चुकीच्या बाजूने वाहन चालवणे’ या कारणास्तव चुकीच्या पद्धतीने दंड आकारण्यात आला. या चुकीच्या दंडातून 12.4 कोटी रुपये वसूल झाले. विशेष म्हणजे, यातील बहुतांश वाहने आपल्या नियोजित मार्गावर योग्यरित्या चालत होती, तरीही स्वयंचलित कॅमेरा प्रणालीच्या त्रुटीमुळे त्यांना दंड ठोठावण्यात आला.
महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने (MSRDC) लागू केलेल्या या तंत्रज्ञानावर आधारित देखरेख यंत्रणेचा उद्देश रस्ता सुरक्षितता वाढवणे होता, परंतु त्यातील त्रुटींमुळे लाखो वाहनचालकांना अडचणींचा सामना करावा लागला. मुंबई-पुणे द्रुतगती मार्ग हा महाराष्ट्रातील सर्वात व्यस्त रस्त्यांपैकी एक आहे, जो 95 किलोमीटर लांबीचा आहे आणि दररोज हजारो वाहने यावरून प्रवास करतात. या मार्गावर रस्ता सुरक्षितता वाढवण्यासाठी आणि नियमभंग करणाऱ्या वाहनचालकांवर कारवाई करण्यासाठी 2023 मध्ये इंटेलिजंट ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टम (ITMS) लागू केली.
या प्रणालीत 40 गॅन्ट्री आणि शेकडो उच्च-रिझोल्यूशन CCTV कॅमेरे बसवण्यात आले, ज्यांची किंमत 100 कोटी रुपयांहून अधिक आहे. या कॅमेऱ्यांद्वारे वेगाने वाहन चालवणे, चुकीच्या लेनमध्ये जाणे, सीटबेल्ट न घालणे, आणि चुकीच्या बाजूने वाहन चालवणे यासारख्या उल्लंघनांची नोंद केली जाते. परंतु, आरटीआय माहितीनुसार, जुलै ते डिसेंबर 2024 मध्ये जारी झालेल्या 18.25 लाख ई-चलनांपैकी 34% म्हणजेच 6.24 लाख चालन चुकीची होती. ही त्रटी प्रामुख्याने कॅमेरा कोन आणि जीपीएस क्रॉस-व्हेरिफिकेशनच्या अभावामुळे उद्भवली, ज्यामुळे योग्य लेनमध्ये चालणाऱ्या वाहनांना ‘चुकीच्या बाजूने चालणे’ असा दंड आकारला गेला. (हेही वाचा: Pune Metro: पुणे मेट्रो प्रवाशांसाठी आनंदाची बातमी; लवकरच ताफ्यात दाखल होणार 15 नव्या ट्रेन आणि 45 अतिरिक्त डबे)
या चुकीच्या दंडांमुळे लाखो वाहनचालकांना आर्थिक आणि मानसिक त्रास सहन करावा लागला. प्रत्येक चालानची रक्कम सरासरी 2,000 रुपये होती, आणि अनेक वाहनचालकांनी कायदेशीर गुंतागुंती टाळण्यासाठी किंवा विलंब टाळण्यासाठी हा दंड भरला. आरटीआय कार्यकर्ते के. व्ही. शेट्टी यांनी ही माहिती उघड केल्यानंतर, अनेक वाहनचालकांनी त्यांच्या अनुभवांबाबत X वर व्यक्त केले. प्रशासनाने या त्रुटींची दखल घेत कॅमेरा अँगल सुधारणे आणि देखरेख सॉफ्टवेअरचे पुनरावलोकन करण्यास सुरुवात केली आहे. तसेच, चुकीच्या दंडाची रक्कम परत करण्याबाबतही विचार सुरू असल्याची माहिती आहे, परंतु यासाठी कोणतीही ठोस वेळमर्यादा जाहीर करण्यात आलेली नाही. या प्रकरणाने तंत्रज्ञान-आधारित वाहतूक व्यवस्थापनातील त्रुटी आणि पारदर्शकतेच्या अभावावर प्रकाश टाकला आहे.