Kerala Challan Alert: बाईक (Bike) चालवताना मागे बसलेल्या व्यक्तीशी बोलणे भारतात सामान्य आहे. बाईकर मागे बसलेल्या व्यक्तीशी गप्पा मारत आरामात लांबचा पल्ला गाठतो. मात्र यामुळे लक्ष विचलित होण्याची शक्यता असते व ही बाब मोठ्या अपघातास कारणीभूत ठरू शकते. म्हणूनच आता भारतातील एका राज्यात असे करणे दंडनीय गुन्हा असेल. दुचाकी चालकाने मागे बसलेल्या व्यक्तीशी बोलल्यास त्याला दंड आकाराला जाईल. रिपोर्टनुसार, केरळमध्ये हा नियम लागू झाला आहे.
नुकताच केरळ मोटार वाहन विभागाने (MVD) दुचाकी चालकांसाठी हा एक नवीन नियम लागू केला आहे. रस्ते अपघात कमी करण्याचा या निर्देशाचा उद्देश आहे. एमव्हीडीने सर्व प्रादेशिक परिवहन कार्यालयांना (RTOs) या नियमाची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्यासाठी परिपत्रक पाठवले आहे.
अहवालात म्हटले आहे की, सह परिवहन आयुक्त के. मनोज कुमार यांनी आरटीओला बाईक चालवणाऱ्या व्यक्तीकडून या नवीन नियमाचे उल्लंघन झाल्यास तत्काळ कारवाई करण्याचे आवाहन केले आहे. नियमाचे उल्लंघन केल्याने दंड आकारला जाईल. रस्त्यावरून प्रवास करताना बोलल्याने वाहनचालकाचे लक्ष रस्त्यावरून वळते. यामुळे, तो महत्त्वपूर्ण वाहतूक सिग्नल, पादचारी किंवा इतर अडथळ्यांकडे दुर्लक्ष करू शकतो. मागे बसलेल्या व्यक्तीशी बोलत असताना डोके वळवावे लागते किंवा कधी कधी हातवारे करताना दुचाकी अस्थिर होऊ शकते. यामुळे स्वाराच्या नियंत्रणावर परिणाम होऊन अपघाताची शक्यता असते. (हेही वाचा; Jobs in Indian Railways: भारतीय रेल्वेत काम करण्याची उत्तम संधी; RPF मध्ये भरली जाणार 32,000 पदे)
म्हणूनच हा नियम लागू केला आहे, ज्याचा मुख्य उद्देश दुचाकी चालकाची एकाग्रता वाढवणे हा आहे, ज्याद्वारे मल्टीटास्किंग टाळले जाऊ शकते. तसेच लक्ष विचलित होण्याचे सामान्य स्त्रोत दूर केले जाऊ शकतील आणि अपघात टाळता येतील. एम्स ट्रॉमा सेंटरच्या आकडेवारीवर आधारित अहवालात असे दिसून आले आहे की, देशात 53.97 टक्के रस्ते अपघात दुचाकी वाहनांमुळे होतात. म्हणूनच दुचाकी चालवताना काळजी घेणे गरजेचे आहे.