MTHL Sea Link | Representational & Edited Image (Photo Credits: Pixabay)

शिवडी-न्हावाशेवा (Shivadi-Nhava Sheva) या मुंंबई ट्रान्सहार्बर लिंक (Mumbai Transharbour Link) अर्थातच (MTHL Sea Link) प्रकल्पातील मार्गावरील वाहतूक लवकरच खुली होणार आहे. हा मार्ग खुला झाला की मुंबई ते नवी मुंबई ही दोन शहरे एकमेकांना वेगाने जोडली जातील. इतकी की या दोन्ही शहरांतील अंतर वेगाने कमी होईल. मात्र, या मार्गावरुन वेगवान प्रवास करताना पथकर नाक्यांचे थांबे मात्र वाहनचालकांचे खिसे रिकामे करण्याची शक्यता आहे. कारण या मार्गावर एकूण आठ ठिकाणी टोल नाके (MTHL Sea Link Toll Rates) बसविले जाणार असल्याचे समजते. एमएमआरडीएने तयारीही सुरु केली असून, टोलनाक्यांवरील संभाव्य वेळापत्रकही पुढे आले आहे.

कसा असेल मार्ग

साधारण शिवडी ते न्हावाशेवा दरम्यानचा हा एकूण 21 किमी लांबीचा मार्ग असणार आहे. या 21 किमीपैकी सुमारे 18 किमी लांबीचा मार्ग समुद्रावरुन असणार आहे. हा मार्ग शिवडी येथे सुरु होईल आणि चिर्ले येथे संपेल. या मार्गावरुन प्रवास करताना मुंबई आणि नवीमुंबई दरम्यानचे अंतर केवळ 40 मिनीटांत पार होणे अपेक्षीत आहे. महाराष्ट्र टाईम्स ऑनलाईनने दिलेली आकडेवारीनुसार मुंंबई ट्रान्सहार्बर लिंकवरील संभाव्य टोल पत्रक. खालील प्रमाणे. (हेही वाचा, MSRTC Mumbai-Alandi Bus Service: मुंबई ते आळंदी बससेवा सुरू; माऊलींच्या भक्तांसाठी MSRTC ची खास भेट; जाणून घ्या वेळापत्रक, मार्ग)

वाहन प्रकार - शिवडी ते शिवाजीनगर आणि शिवाजीनगर ते चिर्ले एकूण

कार - 180- 60- 240

हलके व्यावसायिक - 240- 70- 310

बस - 420- 130- 550

अवजड- 420- 130 - 550

बहु चाके - 600- 180- 780

(टीप- लेटेस्टली मराठी वरील दरपत्रकाची पुष्टी करत नाही)

दरम्यान, या मार्गावर एकूण आठ टोलनाके असणार आहेत. त्यापैकी दोन नाके मुख्य असतील त्यापैकी एक शिवडी आणि दुसरा चिर्ले येते मार्गिकेच्या प्रवेशद्वारावरच असतील. इतर सहा नाक्यांपैकी तीन प्रवेश करतेवेळी आणि दुसरे विरुद्ध दिशेने प्रवास सुरु करतेवेळी असतील. हे सर्व पथकर नाके अत्याधुनिक यंत्रणांनीयुक्त असतील.ज्यात फास्टॅग व ईटीसी तंत्रज्ञान वापरले जाईल. हे सर्व टोलनाके 'ओपन रोड टोलिंग' (ओआरटी) या प्रकारच्या यंत्रणेने युक्त असतील.