महाराष्ट्रात हा आठवडा पर्जन्यवृष्टीचा आठवडा ठरला आहे. राज्यातील विविध भागात मुसळधार पावसाने (Maharashtra Rains Update) हजेरी लावली आहे. काही ठिकाणी अतवृष्टीही झाली आहे. पावसाचा फटका राज्यातील शेतीला बसला आहे. अनेक शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. शहर परिसरातही घरांमध्ये पाणी शिरणे, भींत कोसळणे यांसारख्या घटना घडल्या आहेत. या पार्श्वभूमीवर राज्य सरकार सतर्क झाले आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी राज्यातील पूरस्थितीचा ( Flood Situation In Maharashtra) आढावा घेत नुकसानग्रस्त भागाची पाहणी करुन आढावा घेण्याच्या सूचना प्रशासनाला केल्या आहेत. तर उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनीही पावसामुळे झालेल्या नुकसानिचा आढावा घेतला आहे. महाराष्ट्रातील पावसाबद्धलच्या 5 महत्त्वाच्या घटना.
तातडीने पंचनामे तातडीने करण्याचे मुख्यमंत्री ठाकरे यांचे निर्देश
मुसळधार पावसामुळे उद्भवलेल्या स्थितीचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी प्रशासनाकडून आढावा घेतला. शेतकऱ्यांच्या पिकांचे आणि इतर मालमत्तांच्या नुकसानीचा प्रत्यक्ष जाऊन आढावा घ्या. कोणत्याही प्रकारे मनुष्यहानी होणार नाही यासाठी यंत्रणा कार्यन्वीत करा. अशा सूचना मुख्यमत्री उद्धव ठाकरे यांनी प्रशासनाला दिल्या आहे. याशिवाय घरांची पडझड, मालमत्तांचे नुकसान यांचेही तातडीने पंचनामे तातडीने करण्याचे निर्देश मुख्यमंत्री ठाकरे यांनी दिले आहेत. (हेही वाचा, Maharashtra Rains: अतिवृष्टीमुळे राज्यात निर्माण झालेल्या परिस्थितीचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतला आढावा; वायूसेना, नौदल, लष्कर यांना हाय अलर्टवर सज्ज राहण्याच्या सूचना)
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही घेतला आढावा
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही पुणे, पिंपरी चिंचवड शहर आणि राज्यतील विविध भागांचा संबंधित जिल्हाधिकारी तसेच पालिका आयुक्तांकडून आढावा घेतला आहे. दरम्यान, पंढरपूर येथील कुंभारघाट येथे भिंत कोसळल्याने घडलेल्या दुर्घटनेत सहा जणांचा मृत्यू जाला. या घटनेची चौकशी करुन दोषींवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा, असे आदेश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले आहेत.
एनडीआरफच्या तुकड्या तैनात
मुसळधार पावसामुळे उद्भवलेल्या पूरस्थितीचा सामना करण्यासाठी आणि मदत व पुनर्वसन करण्यासाठी राज्यात काही ठिकाणी राष्ट्रीय अपत्ती निवारण म्हणजेच एनडीआरएफच्या तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत. याशिवाय वायूसेना, नौदल, लष्कर यांनाही तातडीच्या मदतीसाठी हाय अलर्टवर राहण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. प्रामुख्याने उस्मानाबाद, सोलापूर, पंढरपूर आणि बारामती या चार ठिकाणी एनडीआरएफच्या तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत. राज्यात सर्वाधिक फटका हा सांगली जिल्ह्याला बसला आहे. त्यामुळे याही ठिकाणी एनडीआरएफ तैनात आहे.
कोकणातही मोठा फटका, वादळ सरले, पूर ओसरला
कोकणातही अनेक ठिकाणी पावसाचा मोठा फटका बसला. रत्नागिरी जिल्ह्यातील अर्जुना, काजळी आदी नद्यांना पूर आला. भातशेतीचे मोठे नुकसान झाले. प्राप्त माहितीनुसार, रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर, लांजा, रत्नागिरीसह संगमेश्वर तालुक्यात सर्वाधिक पाऊस पडला. याशिवाय सिंधुदुर्ग जिल्ह्यातही पावसाची दमदार हजेरी होती. काही ठिकाणी झाडे उन्मळली तर काही ठिकाणी रस्ते उखडले. काही ठिकाणी घराचे छप्पर कोसळल्याचे पाहायला मिळाले.
हवामान खात्याकडून आजही मुसळधार पावसाचा इशारा
गेले तीन चार दिवस राज्यात मुसळधार पाऊस कोसळत आहे. राज्यात अशा प्रकारचा पाऊस कोसळेल असा इशारा हवामान खात्याने आधीच दिला होता. हाच इशारा कायम ठेवत आजही राज्यातील काही भागात मुसळधार पाऊस कोसळण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.
दरम्यान, बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले आहे. त्यामंळे राज्यात अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस कोसळत आहे. मुसळधार पावसामुळे राज्यातील जनजीवन मोठ्या प्रमाणावर विस्कळीत झाले आहे. शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. नागरिकांच्या घरांमध्येही पाणी शिरले आहे.