राज्यात सध्या मुसळधार पाऊस (Heavy Rains) चालू आहे. पश्चिम महाराष्ट्र, कोंकण, मध्य महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाडा अशा सर्वच ठिकाणी पावसाचा जोर वाढला आहे. अशात काल पंढरपूर येथे घडलेल्या दुर्घटनेमध्ये 6 जणांचा मृत्यू झाला आहे. आता पावसाचा जोर अजूनही वाढण्याची शक्यता वर्तवण्यात आल्याने, परतीचा पाऊस, वादळी अतिवृष्टीमुळे राज्यात निर्माण झालेल्या परिस्थितीचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विविध यंत्रणांकडून घेतला आढावा. शेतपिक आणि मालमत्ता नुकसानीबाबत माहिती घेतानाच त्यांनी सर्व यंत्रणांना मनुष्यहानी होऊ नये यासाठी सतर्क राहण्याचे निर्देशही दिले आहेत.
अतिवृष्टी, वादळी पावसामुळे शेतीचे, पिकांचे नुकसान याबाबत तसेच घरांची पडझड, मालमत्तांचे नुकसान यांचेही तातडीने पंचनामे करण्याचे निर्देश मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी दिले आहेत. आवश्यक त्या ठिकाणी राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाच्या तुकड्या तैनात करण्यात याव्यात आणि तातडीच्या मदतीसाठी अग्निशमन, पोलिस, तसेच महसूल आणि वैद्यकीय अशा सर्वच विभागांना मदत पथके पाठविण्याबाबतही मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी निर्देश दिले आहेत. यासह उस्मानाबाद, सोलापूर, पंढरपूर, बारामती या ठिकाणी एनडीआरएफच्या तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत. वायूसेना, नौदल, लष्कर यांना हाय अलर्टवर सज्ज राहण्याच्या सूचना दिल्या आहेत.
राज्यात परतीचा पाऊस आणि वादळी अतिवृष्टीमुळे निर्माण झालेल्या परिस्थितीचा मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी विविध यंत्रणांकडून आढावा घेतला. शेतपिक आणि मालमत्ता नुकसानीबाबत माहिती घेतानाच त्यांनी सर्व यंत्रणांना मनुष्यहानी होऊ नये यासाठी सतर्क राहण्याचे निर्देशही दिले आहेत.
— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) October 15, 2020
दरम्यान, पंढरपुरातील कुंभार घाट येथे भिंत कोसळल्याच्या दुर्घटनेबाबत मुख्यमंत्र्यांनी दुःख व्यक्त केले आहे, तसेच मृतांच्या कुटुंबियांना तातडीची आर्थिक मदत देण्याचे निर्देश दिले. (हेही वाचा: पंढरपूर येथे भिंत कोसळून 6 जणांचा मृत्यू; घटनेची चौकशी करुन दोषींवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे आदेश)
दरम्यान, परतीचा पाऊस आणि कमी दाबाच्या पट्ट्यामुळे राज्यात सर्वदूर अशी वादळी पावसाची परिस्थिती निर्माण झाली आहे. वेगाने वाहणारे वारे आणि ढगफुटीतून निर्माण होणारी अतिवृष्टीची परिस्थिती यामुळे राज्यात अनेक जिल्ह्यांमध्ये विशेषतः पुणे, सोलापूर, उस्मानाबाद आणि लातूर जिल्ह्यात जोरदार पाऊस झाला आहे. सोलापूर जिल्ह्यात उजनी धरण क्षेत्रातील गावांमध्ये पूरस्थिती निर्माण झाली आहे. पुणे जिल्ह्यातील सर्वच तालुक्यांमध्ये अतिवृष्टी झाली आहे. जिल्ह्यातील सर्वच धरणे पूर्णपणे भरली आहेत. बारामती तालुक्यालाही मोठा फटका बसला आहे. उस्मानाबाद, बीड, लातूर जिल्ह्यात अतिवृष्टी झाली आहे. जायकवाडी व माजलगाव धरणातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरु आहे.