महाराष्ट्रात सध्या पावसाचा जोर वाढला आहे. राज्यात 17 ऑक्टोबरपर्यंत मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. अशात काल पंढरपूर येथे झालेल्या दुर्घटनेमध्ये 6 जणांचा मृत्यू झाला आहे. पंढरपूर येथे कुंभारघाटाची भिंत कोसळून त्याच्या आडोशाला उभ्या असलेल्या 6 जणांना आपला प्राण गमावला लागला आहे. आता या प्रकरणाची चौकशी करुन दुर्घटनेतील दोषींवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा असे आदेश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले आहेत. सोबतच महाराष्ट्र टाईम्सच्या वृत्तानुसार, या दुर्घटनेत मृत्यू झालेल्या नागरिकांच्या कुटुंबियांना राज्य शासनाकडून प्रत्येकी चार लाख रूपयांची मदत जाहीर करण्यात आली आहे.
कुंभारघाट हा चंद्रभागेच्या तीरावरती बांधण्यात येत आहे. काल सकाळपासून पंढरपूर येथे मुसळधार पाऊस सुरु आहे. चंद्रभागेच्या वाळवंटामध्ये झोपड्या बांधून राहणाऱ्या लोकांनी पावसामुळे आपल्या झोपड्या घाटाच्या आडोशाला मांडल्या होत्या. यावेळी इथे 8 जण भिंतीच्या आडोशाला उभे होते. भिंत कोसळून त्यातील 6 जणांचा मृत्यू झाला असून, त्यापैकी दोघांना वाचवण्यात यश आले. काल दुपारी साधारण अडीच वाजता ही दुर्घटना घडली. आता या दुर्घटनेतील दोषींवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याचे आदेश देण्यात आले आहे. बुधवारी (14 ऑक्टोबर) पहाटे 3 ते दुपारी 3 या कालावधीत बार्शी तालुक्यात विक्रमी अतिवृष्टी झाली. या कालावधीत तालुक्यात सरासरी 150 मिमी पेक्षाही अधिक पाऊस पडला.
दरम्यान महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज राज्यातील पावसाचा आढावा घेतला. पुणे, पिंपरी-चिंचवड शहरासह जिल्ह्यातील अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर संबंधित जिल्हाधिकारी तसेच पालिका आयुक्तांकडून परिस्थितीचा आढावा घेत, पवार यांनी अतिवृष्टी झालेल्या जिल्ह्यातील जिल्हाधिकाऱ्यांशी संपर्क साधून सतर्क राहण्याचे आणि बचाव, मदतकार्य तत्परतेने करण्याचे निर्देश दिले आहेत. (हेही वाचा: मुसळधार पावसामुळे पंढरपूर येथील कुंभारघाटाची भिंत कोसळली; 6 जणांचा मृत्यू, बचावकार्य सुरु)
तसेच हवामान खात्याने दिलेल्या इशाऱ्याची नोंद घेऊन नागरिकांनी खबरदारी घ्यावी. पोलीस व प्रशासनाने सतर्क राहण्याच्या सूचना संबंधित जिल्हा व पोलीस प्रमुखांना दिल्या आहेत. यासह कोकण, पश्चिम-मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भासह अनेक भागात शेती व घरांचे नुकसान झाले आहे, त्यांचे पंचनामे तात्काळ सुरु करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.