पंढरपूर येथील कुंभारघाटाची भिंत कोसळली (संग्रहित संपादित प्रतिमा)

सध्या महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी पावसाची जोरदार बॅटींग सुरु आहे. सरकारने 13 ऑक्टोबर ते 17 ऑक्टोबरदरम्यान मुसळधार पावसाचा (Heavy Rains) इशारा दिला आहे. अशात पंढरपूर (Pandharpur) येथून एक दुःखद बातमी समोर येत आहे. इथल्या कुंभारघाटाची भिंत कोसळली आहे. या दुर्घटनेमध्ये आतापर्यंत 6 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे व अजून 6-7 जण ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे. चंद्रभागा (Chandrabhaga) तीरावरती हा घाट आहे व पाऊस सुरु असल्याने आडोशाला हे लोक त्या ठिकाणी उभे होते.

साधारण दुपारी अडीच वाजता ही घटना घडली. कुंभारघाट हा चंद्रभागेच्या तीरावरती बांधण्यात आला आहे. सकाळपासून पंढरपूर येथे मुसळधार पाऊस सुरु आहे, अशावेळी आडोशाला हे लोक इथे उभे होते व आता त्यांच्यावर काळाने घाला घातला आहे. सध्या या ढिगाऱ्याखालून सर्वांना सुखरूप बाहेर काढण्याचे काम युद्धपातळीवर सुरु आहे. एका बाजूला दुथडी भरून वाहणारी चंद्रभागा नदी तर दुसरीकडे घाट, त्यात कोसळत असलेला मुसळधार पाऊस यामुळे बचावकार्यात अडथळा निर्माण होत आहे. सध्या पावसामुळे इथे पूरसदृश्य स्थिती निर्माण झाली आहे. (हेही वाचा: कोल्हापूर, सातारा, लातूर जिल्ह्यांसह महाराष्ट्रात मुसळधार पाऊस; अनेक ठिकाणी अतिदक्षतेचा इशारा)

पीटीआय ट्वीट -

चंद्रभागेच्या वाळवंटामध्ये झोपड्या बांधून राहणाऱ्या लोकांपैकी हे लोक होते. पावसामुळे त्यांनी आपल्या झोपड्या घाटाच्या आडोशाला मांडल्या होत्या. या घटनेची माहिती मिळताच प्रांताधिकारी सचिन ढोले मुख्याधिकारी अनिकेत मानूरकर हे जेसीबी व रुग्णवाहिकेसह घटनास्थळी रवाना झाले आहेत. दरम्यान, भारतीय हवामान विभागाने दिलेल्या इशाऱ्यानुसार दि. 13.10.2020 ते  17.10.2020 या कालावधीत राज्यात वीजेच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता वर्तविली आहे. विशेषत: किनारपट्टीलगतच्या सर्व जिल्ह्यामध्ये वीजेच्या कडकडाटासह मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तविण्यात आलेली आहे. या पावसामुळे राज्यात कोणतेही नुकसान होऊ नये म्हणून आधी सरकारने सतर्कतेचा इशारा दिला आहे.