Hair Loss | (Photo credit: archived, edited, representative image)

Buldhana Takkal Virus: केस गळणे (Hair Loss Cause) आणि टक्कल पडणे () यांसारख्या आरोग्यविषयक समस्यांमुळे बुलढाणा जिल्हा आणि त्यातील काही गावे जोरदार चर्चेत आहेत. इतकी की, या समस्येची उकल करण्यास जिल्हा आरोग्य विभागही अयशस्वी ठरल्याने चक्क इंडियन काऊंसिल ऑफ मेडिकल रिसर्च (ICMR) म्हणजेच भारतीय आयुर्विज्ञान अनुसंधान परिषद या संस्थेस पाचारण करण्यात आले. या संस्थेचे दिल्ली आणि चेन्नईची दोन खास पथके टक्कल व्हायरस प्रभावित गावांमध्ये फिरून माहिती घेऊ लागली. मात्र, प्रथमदर्शनी त्यांनाही या समस्येची उकल करता आली नाही. प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, अख्ख्या जगामध्ये आपण हा प्रकार पाहिला नसल्याचे उद्गार पथकातील काही अधिकाऱ्यांनी काढल्याचे समजते.

टक्कलग्रस्त नागरिकांच्या गावात आयसीएमआर

आयसीएमआरची विशेष पथके बुलढाणा जिल्ह्यात आली असून, केस गळतीने त्रस्त असलेल्या टक्कलग्रस्त नागरिकांच्या गावात ही पथके पाहणी करत आहेत. या पथकातील अधिकाऱ्यांच्या हवाल्याने एबीपी माझाने दिलेल्या वृत्तात म्हटले आहे की, जिल्ह्यातील शेगाव तालुक्यात काही गावांमध्ये केस गळणे थोड्या दिवसांनी नागरिकांना टक्कल पडणे यांसारख्या समस्येचे निदान होण्यास साधारणत: एक महिना किंवा त्याहूनही अधिक काळ लागू शकतो. सध्या आयसीएमआरचे हे पथक नागरिक आणि आरोग्य विभागाशी संवाद साधून विविध प्रकारची माहिती, नमुने गोळा करत आहे. इतकेच नव्हे तर जगभरामध्ये विशिष्ट प्रदेशांमध्ये अशाच प्रकारे केसगळती घडल्याची प्रकरणे कधी घडल्याचे अभ्यासात आले नाही. त्यामुळे या प्रकाराचा अभ्यास करायला वेळ लागेल, असेही अधिकाऱ्यांनी म्हटल्याचे समजते. (हेही वाचा, Hair Loss Outbreak Buldhana: केस गळणे, टक्कल पडणे प्रकरणी ICMR द्वारे चौकशी; दिल्ली, चेन्नईचे पथक बुलढाणा जिल्ह्यात)

महिलांनाही टक्कल

बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव तालुक्यात जवळपास 15 ते 16 गावे अचानक नागरिकांच्या केसगळती आणि टक्कल पडण्याने ग्रासली आहेत. धक्कादायक म्हणजे ही समस्या केवळ पुरुषच नव्हे तर महिलांमध्येही पाहायला मिळत आहे. त्यामुळे गावकरी हवालदील झाले आहे. अनेक तरुण आगोदरच लग्नाविना रखडले आहेत. त्यातच ही केसळती आणि टक्कल व्हायरस उद्भवला आहे. त्यामुळे आपल्याला लग्नासाठी मुली तरी कोण देणार? असा सवाल तरुणांपुढे निर्माण झाला आहे. (हेही वाचा, Why Do Men Go Bald? पुरुषांचे केस का गळतात? त्यांना टक्कल पडण्याची कारणे काय? तज्ज्ञांनी सांगितली कारणे)

दरम्यान, जिल्हा आरोग्य विभागाने या प्रकारावर काही संशोधन करुन निष्कर्ष काढण्याचा प्रयत्न केला. जिल्हा आरोग्य विभागाने केलेल्या अभ्यासातून आलेल्या निष्कर्षानुसार, गावातील पाणी प्रदुषीत आहे. या पाण्यात नायट्रेट आणि क्षारांचे प्रमाण प्रचंड आहे. सामान्य स्थितीपेक्षा अधिक मोठ्या प्रमाणावर क्षारयुक्त पाणी वापरल्याने या नागरिकांना त्वचा आणि केसांशी संबंधीत समस्या निर्माण झाल्याचे आरोग्य विभाग सांगतो. दरम्यान, आयसीएमआरच्या अहवालात काय निष्कर्ष निघतो याबाबत उत्सुकता आहे.