Hair Smuggling Racket: केसांची तस्करी करणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश! हैदराबादपासून चीनमध्ये पसरला 11 हजार कोटींचा काळा धंदा, ED च्या तपासात मोठा खुलासा
Hair Smuggling Racket (संग्रहित संपादित प्रतिमा)

Hair Smuggling Racket: चीनमध्ये (China) लोकांना टक्कल पडण्याच्या वाढत्या समस्येचा फायदा घेत एक अवैध टोळी भारत-म्यानमारमार्गे केसांची तस्करी (Hair Smuggling Racket) करत असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. नुकतेच अंमलबजावणी संचालनालयाच्या (ED) तपासात या टोळीचा 11,793 कोटी रुपयांचा काळा धंदा उघड झाला आहे. या केसांच्या तस्करीमध्ये हैदराबाद, मिझोराम आणि म्यानमार या तीन प्रमुख मार्गांचा समावेश असून, काळा पैसा मनी लाँड्रिंगद्वारे परत आणला जात असल्याचे तपासात उघड झाले आहे. हा काळा पैसा म्यानमारच्या व्यावसायिकांकडून परत हैदराबादला कसा पोहोचवला गेला हेही तपासात समोर आले आहे. एकूण 11,793 कोटी रुपयांपैकी सुमारे 2,491 कोटी रुपये रोख (21% पेक्षा जास्त) अनेक खात्यांमध्ये जमा केले गेले आणि नंतर वेगवेगळ्या प्रकारे ते वळवले गेले.

फेब्रुवारी 2022 मध्ये, इडीने देशभरात छापे टाकले आणि म्यानमारमधून केस निर्यातीच्या या रॅकेटचा पर्दाफाश केला. टाइम्स ऑफ इंडियाने हे संपूर्ण प्रकरण उघड केल्यानंतर, ईडीने हैदराबादस्थित नायला फॅमिली एक्सपोर्ट्स प्रायव्हेट लिमिटेडविरुद्ध गुन्हे दाखल केले. या कंपनीवर बनावट आयात-निर्यात कोड (IEC) वापरणे, फसवणूक करणे आणि इतरांच्या नावाने (बेनामी) कंपन्या चालवल्याचा आरोप आहे. हैदराबाद विमानतळ आणि इतर रस्ते मार्गाने म्यानमार, बांगलादेश, व्हिएतनाम आणि चीनमध्ये केसांची तस्करी केली जात होती.

अहवालानुसार, नायला कंपनीने अनेक बनावट कंपन्या तयार केल्या असून, त्याद्वारे अत्यंत कमी किमतीत केसांची निर्यात केली जात असल्याचेही तपासात निष्पन्न झाले आहे. टाईम्स ऑफ इंडियाकडे उपलब्ध दस्तऐवज दर्शविते की, जेव्हा जेव्हा या कंपन्या कर विभागाशी अडचणीत आल्या तेव्हा त्या बंद केल्या गेल्या आणि नवीन आयइसी तयार केले गेले. अंदाजानुसार, या तस्करीतून दरवर्षी सुमारे 8,000 कोटी रुपये हवालाद्वारे मिळत होते. (हेही वाचा: Bengaluru Female Foeticide Case: धक्कादायक! बेंगळुरूमधील नेलमंगला येथील रुग्णालयात 74 भ्रूणहत्या; डॉक्टर आणि मालक फरार, Asare Hospital विरोधात गुन्हा दाखल)

ईडीच्या तपासात असे आढळून आले आहे की, तेलंगणा आणि आंध्र प्रदेशातील व्यापारी उत्तर-पूर्व आणि कोलकाता येथील शेल संस्थांना केस विकत होते, तेथून ही खेप प्रथम म्यानमार आणि नंतर चीनला पाठवली जायची. संस्थांना Mule बँक खात्यांद्वारे किंवा हवाला नेटवर्कद्वारे किंवा Dokipay आणि LinkedIn सारख्या चीनी ॲप्सद्वारे पेमेंट प्राप्त होते. मिझोरामचा रहिवासी लुकास हा बेकायदेशीर सीमा ओलांडण्याची व्यवस्था करत असल्याचे ईडीच्या तपासात समोर आले आहे.