प्रत्येक विद्यार्थ्याच्या आयुष्यात दहावी आणि बारावी या दोन परीक्षा अत्यंत महत्त्वाच्या असतात. या परीक्षांच्या आधारावर त्यांचे करिअर ठरत असते. परंतु, अनेक विद्यार्थी या परीक्षेत अनुत्तीर्ण होतात. त्यामुळे अनेक विद्यार्थी पुढील शिक्षणाकडे पाठ वळवतात. मात्र, आता सरकारने अशा अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांना दिलासा दिला आहे. अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांना रोजगार मिळवता यावा यासाठी त्यांना कौशल्य विकास प्रशिक्षण देण्यात यावे, अशी घोषणा मागील सरकाराने केले होती. आता सरकारने याबाबत परिपत्रक काढले आहे. आता दहावी आणि बारावीच्या परीक्षेत 3 किंवा त्यापेक्षा अधिक विषयांमध्ये उत्तीर्ण न होऊ शकलेल्या विद्यार्थ्यांच्या गुणपत्रिकेवर 'अनुत्तीर्ण' (Fail) शेरा न देता 'कौशल्य विकासास पात्र' असा शेरा देण्यात येणार आहे. सरकारने यासंदर्भात महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाला आदेश दिले आहेत. सरकारने अशा विद्यार्थ्यांसाठी 'कौशल्य सेतू कार्यक्रम' योजना सुरू केली आहे. या योजनेनुसार, अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांना कौशल्य प्रशिक्षण देणे, विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास निर्माण करुन देऊन रोजगार मिळवण्याची क्षमता निर्माण केली जाणार आहे. (हेही वाचा - देशभरात पुढील वर्षी NEET ची परीक्षा 3 मे 2020 रोजी होणार, अर्ज प्रक्रिया 2 सप्टेंबर पासून सुरु)
'कौशल्य सेतू कार्यक्रम' योजना -
विद्यार्थ्यांना स्वत:च्या पायावर उभा राहण्यासाठी सरकारने ही योजना सुरू करण्याचे ठरवले आहे. या योजनेमुळे विद्यार्थी आपल्या कौशल्याच्या साहायाने रोजगार मिळवू शकणार आहेत. यासाठी अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांना संगणीकृत पोर्टलवर आपली नोंदणी करावी लागणार आहे. ही नोंदणी करण्यासाठी विद्यार्थ्यांना परीक्षेचे प्रवेशपत्र आणि अनुत्तीर्ण असलेली गुणपत्रिका जोडावे लागणार आहे. तसेच विद्यार्थ्याची वर्गातील किमान 75 टक्के उपस्थिती असल्यास संबंधित उमेदवारास मूल्यमापन करण्याकरिता पात्र ठरविले जाणार आहे.
विशेष म्हणजे विद्यार्थ्यांना अवघड वाटणाऱ्या विषयांशिवाय आता त्यांना परीक्षा देता येणार आहे. यासाठी जानेवारी 2020 पासून 'मुक्त विद्यालया'चे दहावीचे वर्ग सुरू होणार आहेत. मुक्त विद्यालयात प्रवेश घेण्यासाठी आठवी उत्तीर्ण किंवा वयाची 15 वर्षे पूर्ण असणाऱ्या कोणत्याही विद्यार्थ्याला दहावीचा प्रवेश देता येणार आहे. यासाठी दहावी बोर्डाप्रमाणेच अभ्यासक्रम असणार आहे. विद्यार्थ्यांना राज्य शिक्षण मंडळाच्या एकूण 21 व राष्ट्रीय कौशल्य विकास अभ्यासक्रमातील एकूण 14 विषयांमधून हे विषय निवडता येणार आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांना आपल्या आवडीचे विषय निवडता येणार आहेत.