Gopinath Munde Jayanti 2019: 'संघर्षयात्री' गोपीनाथ मुंडे व्यक्तिगत जीवन आणि राजकीय प्रवास
Gopinath Munde | (Photo Credit: Facebook)

Gopinath Munde 70'th Birth Anniversary 2019: गोपीनाथ मुंडे. महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासात ओबीसी (OBC) गटाचे नेतृत्व करणारे आणि समाजातील सर्व घटकांना सोबत घेऊन चालणारे एक हटके व्यक्तिमत्व. घरातून कोणताही राजकीय वारसा नसलेल्या गोपीनाथ मुंडे (Gopinath Munde) यांच्यासाठी राजकीय प्रवास सोपा कधीच नव्हता. उलट त्यांचे राजकीय नेतृत्व आणि व्यक्तिमत्व जसे बहरत गेले तसे त्यांच्या आडचणी आणि संघर्षही वाढत गेला. स्थानिक विरोधक आणि पक्षांतर्गत विरोधकांचा सामना करतानाच त्यांना कुटुंबकलहाचाही सामना करावा लागला. धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांनी साथ सोडणे, त्यातच मित्र, सल्लागार आणि राजकीय रणनितीकार अशी बहुआयामी भूमिका निभावणारे प्रमोद महाजन (Pramod Mahajan) यांच्या निधनाचा धक्का. विलासराव देशमुख (Vilasrao Deshmukh) यांच्यासारख्या दिलदार मित्राचा झालेला अकाली मृत्यू यांसारख्या एक ना अनेक धक्क्यांतून गोपीनाथ मुंडे यांचे नेतृत्व आघाडी घेत होते. एका बाजूला गोपीनाथ मुंडे राजकीय नेतृत्वात आघाडी घेत होते. परंतू, पक्षांतर्गत लढाईत आणि व्यक्तिगत पातळीवरही एकटे पडत असल्याचे चित्र होते. कारण, सामाजिक जीवनात त्यांच्याशी अत्यंत जवळीक असलेल्या लोकांचा सहवास नियतीने हिरावून घेतला जात असतानाच पक्षातील एक गट त्यांच्या नेतृत्वाला मर्यादा घालण्यासाठी प्रयत्न करत होता. या सर्वांवर मात करत गोपीनाथ मुंडे वरचढ ठरत होते. लोकसभा निवडणूक 2014 मध्ये याची जाणीव प्रामुख्याने झाली. गोपीनाथ मुंडे खासदार झाले. महाराष्ट्रातूनही भाजपला चांगले यश मिळाले. मुंडे यांना केंद्रात कृषीमंत्रिपद मिळाले. आघाडी सरकारमध्ये हे पद राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्याकडे होते. केंद्रात सत्ताबदल झाला तरी, हे पद महाराष्ट्राच्या नेत्याकडेच कायम राहिले. त्यामुळे त्यांचे चाहते आणि महाराष्ट्रातील जनता आनंदात होती. हा आनंद साजरा होत असतानाच ती अप्रिय बातमी आली. गोपीनाथ मुंडे यांचे दिल्ली येथे अपघाती निधन. या बातमीने मुंडे यांच्या समर्थकांसह महाराष्ट्राला धक्का बसला. गोपीनाथ मुंडे यांची आज (12 डिसेंबर) जयंती. पाहूयात 'संघर्षयात्री' गोपीनाथ मुंडे व्यक्तिगत जीवन (Gopinath Munde Personal Life) आणि राजकीय प्रवास (Gopinath Munde Political Journey).

गोपीनाथ मुंडे व्यक्तिगत जीवन (Gopinath Munde Personal Life)

बीड जिल्ह्यातील परळी वैजनाथ तालुक्यात असलेल्या नाथरा गावात 12 डिसेंबर 1949 रोजी जन्मलेला हा पुढे जाऊन इतका मोठा नेता होईल असे गावकऱ्यांना कधीच वाटले नसेल. गोपीनाथ मुंडे यांचे बालपण सर्वसामान्य कुटुंबातच गेले. त्यांनी प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण परळी वैजनाथ येथील जिल्हा परिषद शाळेत घेतले. मात्र, महाविद्यालीनय शिक्षण घेण्यासाठी ते काही काळ अंबाजोगाई आणि पुढे पुणे येथे गेले. पुणे येथेच ते खऱ्या अर्थाने राजकीय क्षेत्राकडे आकृष्ट झाले. 1976 मध्ये त्यांनी आरएलएल पदवी घेऊन कायद्याचा अभ्यास पूर्ण केला. तोपर्यंत मुंडे यांचे जीवन सर्वसामान्यच होते. त्याला फारशी राजकीय गती मिळाली नव्हती. नाही म्हणायला ते राजकारणाशी संबंध ठेऊन होते. मात्र, ते फारसे दृढ किंवा विस्तारीत नव्हते. (हेही वाचा, 'स्वाभिमान' शब्द वापरत पंकजा मुंडे यांचे ट्विट; कार्यकर्त्यांना '12 डिसेंबर ' 'गोपीनाथ गड' येथे येण्याचे आमंत्रण)

Gopinath Munde | (Photo Credit: Facebook)

गोपीनाथ मुंडे राजकीय प्रवास (Gopinath Munde Political Journey)

प्रमोद महाजन यांच्यासोबतची मैत्री प्रेरणा ही गोपीनाथ मुंडे यांच्या राजकीय प्रवेशाचे निमित्त ठरले. गोपीनाथ मुंडे यांचा 1971 मध्येच राजकारणाशी संबंध आला. लोकसभा निवडणूक 1971 मध्ये त्यांनी जनसंघाच्या उमेदवारासाठी बीड लोकसभा मतदारसंघात सक्रीय प्रचार केला. त्यादरम्यानच पुणे येथे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या संघ शिक्षा वर्गातही सहभाग घेतला. त्या वेळी त्यांच्याकडे संभाजी नगर मंडळ कार्यालय आणि त्यांतर्गत येणाऱ्या सहा शाखांची संघटनात्मक जबाबदारी होती. तसेच ते पुणे विद्यार्थी शाखेचे प्रभारीही होते.

आणिबाणी आणि तुरुंगवास

1970-73 मध्ये मराठवाडा विकास आंदोलन आणि पुढे 1975-76 मध्ये इंदिरा गांधी यांनी लादलेल्या आणीबाणी विरोधी आंदोलनात ते सक्रीय होते. आणीबाणी काळात त्यांना 16 महिन्यांचा तुरुंगवासही भोगावा लागाला होता.

Gopinath Munde | (Photo Credit: Facebook)

1978 मध्ये त्यांनी बीड जिल्हा परिषद निवडणुकीत उजनी (अंबे) मतदारसंघातून पहिला विजय मिळवला. तिथून त्यांची राजकीय कारकीर्द खऱ्या अर्थाने सुरु झाली. पुढे 1980 मध्ये ते रेणापूर विधानसभा मतदारसंघातून विजयी झाले आणि आमदार म्हणून पहिल्यांदाच विधिमंडळात दाखल झाले. त्यांनी मराठवाडा विद्यापीठ नामांतर आंदोलनात सहभाग घेतला. पुढे भारतीय जनता पक्ष संघटनात्मक जबाबदारीही त्यांच्यावर आली. 19880-82 या काळात त्यांनी भारतीय जनता पत्र युवा मोर्चा प्रदेशाध्यक्ष म्हणून काम पाहिले. तर 1985 मध्ये ते थेट भाजप प्रदेशाध्यक्ष झाले. पुढे ते सातत्याने विधिमंडळावर निवडूण येऊ लागले.

सत्ता सहभाग आणि मंत्रिपद

दरम्यान, 1995-999 या काळात शिवसेना भाजप सरकार सत्तेवर आले. महाराष्ट्रात काँग्रेसेत्तर सरकार पहिल्यांदाच बहुमताने सत्तेवर आले होते. युती सरकारच्या काळात मुख्यमंत्री मनोहर जोशी यांच्या मंत्रीमंडळात मुंडे यांनी उपमुख्यमंत्री, गृह, अर्थ, पाटबंधारे, उर्जा आदी खात्यांचा कार्यभार सांभाळला. या काळात त्यांनी “मोक्का” कायदा, गुंतवणूकदारांना संरक्षण देणारा कायदा,भटक्या मुक्त जमातीसाठी मंत्रालय,मागसजाती व आर्थिक दुर्बलांच्या विकासासाठी स्वतंत्र महामंडळ आदी महत्वाचे निर्णय घेतले.

Gopinath Munde | (Photo Credit: Facebook)

केंद्रीय मंत्रिपद आणि अपघाती निधन

लोकसभा निवडणूक 2014 मध्ये भाजपला देशभारत घवघवीत यश मिळाले. यात महाराष्ट्राचा मोठा वाटा होता. महाराष्ट्रात भाजपचा विजय होण्यात गोपीनाथ मुंडे यांची महत्त्वाची आणि निर्णायक भूमिका होती. गोपीनाथ मुंडे हे स्वत: बीड लोकसाभा मतदारसंघातून तब्बल 1 लाख 36 हजार इतक्या विक्रमी मतांनी विजयी झाले. भाजपच्या यशात त्यांचा सिंहाचा वाटा असला तरी, त्यांना केंद्रात मंत्रिपद मिळवण्यासाठी मात्र मोठा संघर्ष करावा लागला असे त्यांचे निकटवर्तीय सांगतात. अखेर 26 मे 2014 या दिवशी मुंडे यांनी केंद्रीय कृषी आणि ग्रामविकास मंत्री म्हणून शपथ घेतली.

गोपीनाथ मुंडे यांचा राजकीय आणि व्यक्तिगत प्रवास बहुदा नियतीला मान्य नसावा. 3 जून 2014 या दिवशी म्हणजेच केंद्रीय मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर अवघ्या काही दिवसांतच बातमी आली 'केंद्रीय मंत्री गोपीनाथ मुंडे यांचे अपघाती निधन'. या बातमीने महाराष्ट्र हळहळला. त्यांच्या समर्थकांना हा मोठा धक्का होता. गोपीनाथ मुंडे यांचे नाव महाराष्ट्राच्या राजकारणात मोठ्या आदराने घेतले जाते.