'स्वाभिमान' शब्द वापरत पंकजा मुंडे यांचे ट्विट; कार्यकर्त्यांना '12 डिसेंबर ' 'गोपीनाथ गड' येथे येण्याचे आमंत्रण
Pankaja Munde | (Photo Credit: Facebook)

पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांनी रात्री उशीरा एक ट्विट (Pankaja Munde Tweet) केले आहे. या ट्विटमुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या असून, पंकजा मुंडे यांच्या मनात नेमकं चाललंय तरी काय? अशी चर्चा सुरु झाली आहे. '12 डिसेंबर ' रोजी सकाळी 11 वाजता आपल्या लोकनेत्याच्या स्मरणार्थ आपल्या सर्वांना 'गोपीनाथ गड' (Gopinath Gad) येथे आमंत्रण. तुम्ही सारे या .. हा दिवस आपला स्वाभिमान दिवस आहे. तुम्ही ही या .. वाट पहाते', असे पंकजा मुंडे यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे. पंकजा यांनी आपल्या ट्विटमध्ये वापरलेल्या '.. हा दिवस आपला स्वाभिमान दिवस आहे' या वाक्यामुळे राजकीय वर्तुळात अनेक तर्कवितर्क आणि चर्चा रंगू लागल्या आहेत. मात्र, या चर्चेचा शेवट 12 डिसेंबरलाच होणार आहे.

विधानसभा निवडणूक 2019 मध्ये झालेल्या पराभवानंतर पंकजा मंडे अस्वस्थ होत्या. आपला पराभव विरोधकांकडून नव्हे तर, पक्षांतर्गत विरोधकांनीच केल्याची भावना महाराष्ट्रातील भाजपच्या अनेक नेत्यांची भावना आहे. भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी तर ही भावना उघड बोलून दाखवली आहे. त्यामुळे सत्तेवरुन पायउतार झालेल्या भाजपमध्ये नेतृत्वाकडून डावललेल्या नेत्यांमध्ये मोठी अस्वस्थता आहे. ही अस्वस्थता दूर करण्यासाचाही मोठा प्रयत्न भाजपच्या राज्यातील नेतृत्वाकडून केला जात असल्याची चर्चा आहे. मात्र, त्याला किती यश येतं हे येणारा काळच सांगू शकणार आहे.

दरम्यान, गेले काही दिवस एकनाथ खडसे, पंकजा मुंडे, विनोद तावडे, प्रकाश शेंडेगे हे नेते एकत्र आले होते. यावर नाराज लोकांचा गट एकत्र आला आहे काय असे प्रसारमांध्यमांनी विचारले असता, 'नाराजांना एकत्र केले जात नाही ते आपोआप एकत्र येत असतात' अशी सूचक प्रतिक्रिया एकनाथ खडसे यांनी काही दिवसांपूर्वीच दिली होती. त्यातच एकनाथ खडसे यांनी काल दिल्ली येथे शरद पवार यांची भेट घेतली. त्यानंत ते आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेत आहेत. (हेही वाचा, एकनाथ खडसे घेणार उद्धव ठाकरे यांची भेट; भाजपला सोडचिठ्ठी देत शिवसेना प्रवेशाची चर्चा)

वरील सर्व पार्श्वभूमी पाहाता भाजपमध्ये सर्वच काही अलबेल नाही. येत्या काही काळात भारतीय जनता पक्षाला महाराष्ट्रात मोठा धक्का बसू शकतो, अशी चर्चा होत आहे. भाजपचे अनेक नेते भाजपमध्ये सर्व काही सुरळीत सुरु असल्याचे छातीठोकपणे सांगत आहेत. परंतू, वास्तव चित्र मात्र काही वेगळेच दिसत आहे. दरम्यान, 12 डिसेंबर रोजी पंकजा मुंडे यांचा मेळावा पार पढत आहे. तत्पूर्वी, भाजपच्या कोअर कमेटीची बैठक मुंबई येथे पार पडत आहे. या बैठकीस पंकजा मुंडे उपस्थित राहणार का? याबातही उत्सुकता आहे.