एकनाथ खडसे घेणार उद्धव ठाकरे यांची भेट; भाजपला सोडचिठ्ठी देत शिवसेना प्रवेशाची चर्चा
Chief Minister Uddhav Thackeray, Eknath Khadse | (Photo Credit: Archived, Edited And Representative images)

भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते एनकाथ खडसे (Eknath Khadse) हे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Chief Minister Uddhav Thackeray) यांची भेट आज (10 डिसेंबर 2019) घेणार आहेत. एकनाथ खडसे हे काल राजधानी दिल्लीत होते. दिल्ली (Delhi) येथे जाऊन ते भाजपच्या ज्येष्ठ नेत्यांना भेटतील अशी चर्चा होती. प्रत्यक्षात मात्र तसे न घडता खडसे हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (NCP) अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांना भेटले. काल झालेल्या खडसे पवार आणि त्यानंतर आज लगेचचच होत असलेल्या खडसे-ठाकरे भेटीमुळे राजकीय चर्चांना उधान आले आहे. अशीही एक चर्चा आहे की, भाजपमध्ये अस्वस्थ असलेले एकनाथ खडसे हे शिवसेनेच्या वाटेवर आहेत. मात्र, या चर्चेला अद्याप पुष्टी मिळाली नाही.

एकनाथ खडसे हे भाजपचे ज्येष्ठ नेते आहेत. महाराष्ट्रात पक्षबांधणीसाठी त्यांनी प्रचंड मोठे काम केले आहे. भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांच्यानंतर महाराष्ट्र भाजपमध्ये ते सर्वात ज्येष्ठ नेते होते. त्यामुळे मुंडे यांच्या निधनानंतर त्यांच्याकडे मुख्यमंत्री पदाचा चेहरा म्हणून पाहिले जायचे. पण, वेळ आली तेव्हा प्रत्यक्षात खडसे यांना बाजूला करुन देवेंद्र फडणीस यांची मुख्यमंत्री पदावर वर्णी लागली. खडसे यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळात काम करावे लागले. खडसे हे राज्याचे महसूलमंत्री होते आणि त्यांच्याकडे इतरही जवळपास 12 खात्यांचा कारभार होता. पण, खडसे यांचे हे दिवसही फार काळ टिकले नाहीत. अल्पावधीतच त्यांच्यावर भोसरी येथील भुखंड घोटाळ्याचा आरोप झाला आणि त्यांना पदाचा राजीनामा द्यावा लागला.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांच्या मंत्रिमंडळातील अनेक मंत्र्यांवर भ्रष्टाचार आणि घोटाळ्याचे आरोप झाले. त्यातील बहुतेकांना फडणीस यांनी क्लिन चिट दिली. मात्र, ही क्लिन चिट एकनाथ खडसे यांच्या वाट्याला कधीच आली नाही. त्यामुळे राज्यात भाजपचे बळकट स्थितीतल सरकार असतानाही खडसे यांना सत्तेत राहुनही सत्तेच्या परिघाबाहेरच राहावे लागले. (हेही वाचा, एकनाथ खडसे शरद पवार यांच्या भेटीला; दोघांमध्ये अर्धा तास झाली चर्चा)

दुसऱ्या बाजूला विधानसभा निवडणूक 2019 मध्ये एकनाथ खडसे यांचे तिकीट कापण्यात आले. त्यांच्या ऐवजी त्यांच्या कन्या रोहिणी खडसे यांना तिकीट देण्यात आले. परंतू, त्यांचाही या निवडणुकीत पराभव झाला. तिकडे परळी येथे पंकजा मुंडे यांचाही पराभव झाला. या निवडणुकीत एकनाथ खडसे, विनोद तावडे, चंद्रशेखर बावनकुळे, प्रकाश मेहता अशा अनेक ज्येष्ठ नेत्यांची तिकीटे कापण्यात आली. त्यामुळे असाही एक सूर उमटत आहे की, भाजपमध्ये ओबीसी नेत्यांना डावलले जात आहे. या सर्व संघर्षाची किनार खडसे यांच्या नाराजीमागे आहे. त्यामुळे येत्या काही काळात खडसे काही वेगळा विचार करणार का? याबाबत उत्सुकता आहे.