Eknath Khadse and Sharad Pawar (Photo Credits: PTI)

Eknath Khadse Meets Sharad Pawar: भाजप नेते आणि माजी मंत्री एकनाथ खडसे आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या भेटीस गेले होते. एकनाथ खडसे यांनी पवारांची भेट त्यांच्या दिल्लीतील निवासस्थानी म्हणजेच 6 जनपथ येथे घेतली असल्याचे वृत्त एबीपी माझा या वृत्तवाहिनीने दिली आहे. तसेच दोघांमध्ये तब्बल अर्धा तास चर्चा झाल्याचेही समजते आहे. परंतु, चर्चेचा नेमका विषय काय होता हे अद्याप कळलेलं नाही.

एकनाथ खडसे भाजपातील काही नेत्यांवर नाराज असल्याचे त्यांनी गेल्या काही  दिवसांपासून माध्यमांसमोर बोलून दाखवले आहे. आणि आज ते दिल्लीत भाजपच्याच नेत्यांची भेट घेणार अशी देखील चर्चा समोर आली होती. परंतु, खडसेंनी मात्र शरद पवारांची भेट घेतल्याने राजकीय वर्तुळात सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे.

भाजपच्या महत्त्वपूर्ण बैठकीला पंकजा मुंडे गैरहजर; जाणून घ्या काय आहे या अनुपस्थितीचं कारण

मागील आठवड्यात खडसे यांनी भाजपतील काही नेते पंकजा मुंडे आणि रोहिणी खडसे यांच्या पराभवाला जबाबदार आहेत असं म्हणत थेट हल्लाबोल केला होता. तसेच आज त्यांनी टीव्ही 9 या वृत्तवाहिनीशी बोलताना, पक्षावर अनेक आरोप केले आहेत. "पक्षात माझ्यावर वेगवेगळे आरोप लावून मंत्रिपदावरुन काढण्याचं राजकारण केलं जात आहे. इतकंच काय तर आपल्याच लोकांना हरवण्याचा काम देखील केलं जात आहे. याचे पुरावे मी मांडलेले आहे. त्यामुळे मी याबाबत नक्की विचार करेन. पण पक्ष सोडणार नाही,” असं म्हणत त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली.