भाजपच्या महत्त्वपूर्ण बैठकीला पंकजा मुंडे गैरहजर; जाणून घ्या काय आहे या अनुपस्थितीचं कारण
पंकजा मुंडे (Photo Credits: Facebook)

Pankaja Munde Remains Absent For BJP Meeting: भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे या पक्षावर नाराज असल्याच्या चर्चा मंगल काही दिवसांपासून राजकीय वर्तुळात पाहायला मिळाल्या आहेत. आणि आज भाजपच्या एका महत्त्वाच्या बैठकीला त्या उपस्थित राहिल्या नसल्याने या चर्चांवर शक्कामोर्तब होतं की काय या कडे सगळ्यांचे लक्ष आहे.

भाजप पक्षाची आज मराठवाडा विभागीय बैठक आयोजित करण्यात आली आहे. परंतु या महत्त्वाच्या बैठकीला माजी मंत्री पंकजा मुंडे यांनी मात्र अद्याप तरी हजेरी लावलेली नाही. तसेच प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी माध्यमांना दिलेल्या माहितीनुसार त्या या बैठकीला येणार नसल्याचे कळले आहे. त्यामागचं कारण सांगताना चंद्रकांत पाटील म्हणाले की, “पंकजा मुंडे भाजपच्या मराठावाडा विभागीय बैठकीला उपस्थित राहणार नाहीत, त्यांची तब्बेत ठीक नसून त्यांनी माझी परवानगी घेतली आहे”.

ही बैठक, महाराष्ट्र विधानसभा निवडणुकानंतर विविध विभागात पक्षाच्या कामकाजाचा आढावा घेण्याकरिता आयोजित करण्यात आली आहे. बैठकीला भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, माजी विधानसभा अध्यक्ष हरीभाऊ बागडे यांच्यासह मराठवाड्यातील भाजप काही बडे नेते उपस्थित राहिले आहेत. परंतु, पंकजा मुंडे यांच्या गैरहजेरीमुळे मात्र चर्चांना सुरुवात झाली आहे.

शिवसेना नगरसेवक कमलाकर जामसांडेकर हत्या प्रकरणी अरुण गवळी याला जन्मठेप

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीनंतर शिवसेनेने भाजपशी असलेली मैत्री तोडली. इतकंच नव्हे तर भाजपतील पक्षांतर्गत असणारे नेत्यांमधील हेवेदावे देखील समोर आले. याचा पुढील निवडणुकांवर परिणाम होऊ नये म्हणून भाजप कोअर कमिटीने राज्यात विभागीय स्तरांवर बैठका घेण्यास सुरुवात केली आहे. या आधी अशा बैठका विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रात आयोजित करण्यात आल्या होत्या. आज मराठवाड्यात तर या नंतर पश्चिम महाराष्ट्रात या बैठकीचे आयोजन करण्यात येणार आहे.