अपघातात मृत्यू पावलेल्या व्यक्तीच्या कुटुंबाला 87 लाख रुपये नुकसानभरपाई
प्रातिनिधिक प्रतिमा (Photo Credits: ANI)

रस्ते अपघातातील दुर्घटनाग्रस्तांना सरकार मदत करते. दोन गाड्यांचा अपघात झाला तर ज्याची चुक असेल तो साधारण मदत करतो. मात्र अशाच एका 3 वर्षांपूर्वी झालेल्या अपघातील मृताच्या कुटुंबियांना आता तब्बल 87 लाख रुपये मिळणार आहेत. 2015 साली एका ट्रक अपघातात ही व्यक्ती मरण पावली होती. या अपघाताच्या सुनावणीदरम्यान मोटार अपघात दाव्याची सुनावणी करणाऱ्या लवादाने चक्क 87 लाख रुपये नुकसानभरपाईचे आदेश दिले आहेत. या अपघातात मरण पावलेल्या मदन भगत यांच्या कुटुंबाने लवादामध्ये याचिका दाखल केली. मदन भगत हा घरात एकटाच कमावणारा होता, तो अपघातात मरण पावल्याने त्याचे कुटुंब अक्षरशः रस्त्यावर आले आहे.

5 ऑगस्ट 2015 रोजी मदन भगत हे दुचाकीवरुन मुंब्रा बायपास ब्रिजवरुन रेतीबंदर रोडवरुन ठाण्याच्या दिशेने येत असताना भरधाव वेगात जाणाऱ्या एका ट्रकने त्यांना धडक दिली. या अपघातात त्यांचा मृत्यू झाला. मुंब्रा पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा नोंदवून आरोपी विरोधात आरोपपत्र दाखल केले. मदन भगत हे महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रीसिटी ट्रान्समिशन कंपनीमध्ये नोकरीला होते. त्यांना महिना 45 हजार रुपये पगार होता. मात्र त्यांच्या एकट्यावरच त्यांचे संपूर्ण घर अवलंबून होते. म्हणून कुटुंबाने कोर्टात धाव घेतली होती.

या खटल्याच्या सुनावणीला ट्रक मालक हजर राहिला नाही. अपघाताच्यावेळी ट्रककडे फिटनेस प्रमाणपत्र नव्हते, त्यामुळे पैस देण्याची आमची जबाबदारी नाही अशी विमा कंपनीची भूमिका होती. पण याचिकाकर्त्याला पैसे द्यावे लागतील ते तुम्ही ट्रक मालकाकडून वसूल करा असा निकाल लवादाने दिला. मृताच्या नातेवाईकांना वार्षिक 7.5 टक्के व्याजदराने रक्कमेचे वितरण करा असा आदेश लवादाने दिला आहे.