राज्यातील शेतकऱ्यांना दिलासा! जानेवारी ते मे 2024 या कालावधीत अवकाळी पावसाने झालेल्या नुकसानीबाबत लवकरच मिळणार भरपाई
Farmers | Image Used For Representational purpose Only | Photo Credits: Pixabay.com

राज्यातील अवकाळी पावसाने (Unseasonal Rains) झालेल्या नुकसानीची भरपाई (Compensation) तातडीने द्यावी, याबाबत विरोधकांनी सरकारला  धारेवर धरले होते. त्यानंतर आता सुधारित प्रस्तावानुसार मदत देण्याचे आश्वासन मदत व पुनर्वसनमंत्री अनिल पाटील यांनी दिले आहे. जानेवारी ते मे 2024 या कालावधीत अवकाळी पावसाने झालेल्या नुकसानासाठीची कार्यवाही सुरू असून लवकरच शेतकऱ्यांना मदत मिळणार असल्याचे मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांनी विधान परिषदेत सांगितले.

राज्यात 8 ते 11 एप्रिल या दरम्यान पडलेला अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे शेतकऱ्यांना झालेल्या नुकसानापोटी भरपाई मिळावी, अशी लक्षवेधी सदस्य अमोल मिटकरी यांनी मांडली होती.

मंत्री पाटील म्हणाले की, राज्यात केवळ 8 ते 11 एप्रिल 2024 याच कालावधीत पडलेला अवकाळी पाऊस नाही, तर जानेवारी ते मे 2024 या कालावधीत पडलेल्या पावसाने नुकसान भरपाई मिळावी यासाठी या भागातील पंचनामे करावेत, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार व मदत व पुनर्वसन विभागाने जिल्हाधिका-यांना आदेश दिले होते. त्याप्रमाणे या भागात 2 लाख 91 हजार 433 हेक्टर क्षेत्रात पंचनामे प्राप्त झाले आहेत. त्याच्यामध्ये 3 लाख 23 हजार 219 शेतकरी आहेत. 495 कोटी रुपयांचे प्रस्ताव आहेत. या नुकसानासाठी मदतीच्या निकषापेक्षा जास्त देण्यात यावी, यासाठी जुलैपर्यंत सर्व कार्यवाही पूर्ण होईल, असे मंत्री पाटील यांनी सांगितले. (हेही वाचा: Samruddhi Mahamarg Accident: समृध्दी महामार्गावर भीषण अपघात, दोन कारची एकमेकांना धडक, सात जणांचा मृत्यू)

दरम्यान, राज्यातील सर्वसामान्य, वंचित-उपेक्षित, आर्थिक दुर्बल घटकांसाठी शासनाने विविध योजना सुरु केल्या आहेत. पात्र लाभार्थ्यांना या योजनांचा लाभ वेळीच मिळणे आवश्यक आहे. त्यामुळे श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजना, संजय गांधी निराधार अनुदान योजना, दिव्यांग बांधवांसाठीच्या योजनांसह सर्वच विशेष सहाय्याच्या योजनांचे पैसे प्रत्येक महिन्याच्या 5 तारखेला लाभार्थ्यांच्या खात्यात जमा करण्याचे निर्देश देण्यात येतील, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री अजित पवार यांनी विधानसभेत दिली.