
मराठवाडा अॅक्सिलरेटर फॉर ग्रोथ अँड इन्क्युबेशन कौन्सिल (Marathwada Accelerator for Growth and Incubation Council) च्या पहिल्या स्टार्टअप्सपैकी एक असलेल्या निओ फार्मटेकने महाराष्ट्रातील छत्रपती संभाजीनगर येथे झालेल्या 'ग्रीनोव्हेशन एनर्जी चॅलेंज'मध्ये टॉप 10 मध्ये स्थान मिळवले आहे. विशेष म्हणजे तंत्रज्ञान क्षेत्रातील दिग्गज बिल गेट्स यांनी त्यांचा नाविन्यपूर्ण कीटकनाशक स्प्रे पंप पाहिला आणि त्यांनी त्यावर हातही आजमावला. दिल्ली येथे भारतीय कृषी संशोधन संस्थेने (IARI) आयोजित केलेल्या एका कार्यक्रमात बिल गेट्स यांनी निओ सोलर स्प्रेअर आणि निओ बाहुबली स्प्रेअरच्या अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वैयक्तिक अनुभव घेतला.
त्यांनी निओ सोलर स्प्रेअरचे निरीक्षणच केले नाही तर ते स्वतः वापरून त्याचे काम कसे होते याचा प्रत्यक्ष अनुभवही घेतला. पारंपारिक इंधनावर आधारित स्प्रेअरच्या तुलनेत हे सौरऊर्जेवर चालणारे स्प्रेअर अधिक किफायतशीर आणि पर्यावरणास अनुकूल पर्याय प्रदान करते. बिल गेट्स यांनी निओ बाहुबली स्प्रेअरची देखील चाचणी केली, हे एक तंत्रज्ञान आहे जी मजुरीचा खर्च वाचवते आणि मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांसाठी अधिक कार्यक्षम आहे. परदेशातही या उत्पादनाची मोठी मागणी आहे.
निओ फार्मटेकचा प्रवास 2018 मध्ये सुरू झाला, जेव्हा या प्रकल्पाचे संस्थापक योगेश गावंडे अभियांत्रिकीच्या तिसऱ्या वर्षात होते. मॅजिकच्या मार्गदर्शनाखाली, त्यांचा कॉलेज प्रकल्प एका पूर्ण क्षमतेच्या उत्पादनात विकसित झाला. मिलिंद कंक, सुनील रायठट्टा, प्रसाद कोकीळ, रितेश मिश्रा आणि आशिष गर्दे यांनी त्यांना व्यवसाय मार्गदर्शन, आर्थिक सहाय्य, बाजारपेठेतील प्रवेश आणि उद्योगांशी संबंधित दुवे प्रदान केले. या प्रकल्पाबद्दल माहिती देताना मॅजिकचे संचालक प्रसाद कोकीळ म्हणाले की, विद्यार्थीदशेपासूनच महाविद्यालयीन प्रकल्पाचे प्रत्यक्ष उत्पादनात रूपांतर झाले.
उत्पादन विकासात मॅजिकने महत्त्वाची भूमिका बजावली. मॅजिकच्या मदतीने, निओ फार्मटेकने सोशल अल्फा आणि सीओई फसल सारख्या महत्त्वाच्या संस्थांशी संपर्क साधला, ज्यामुळे स्टार्टअपला वेगाने वाढण्यास मदत झाली. आज निओ परदेशात निर्यात करत आहे. प्रसाद कोकीळ म्हणाले की, निओ फार्मटेकने पाच हजारांहून अधिक संच विकले आहेत, ज्यामुळे 100 हून अधिक तरुणांना रोजगार मिळाला आहे. यातून 3 कोटी रुपयांपेक्षा जास्त महसूल मिळाला आहे. (हेही वाचा: Rising Heatwave Threat: वाढत्या उष्णतेच्या लाटेच्या धोक्यासाठी मुंबईसह नऊ भारतीय शहरे सर्वात असुरक्षित; आव्हानांना तोंड देण्याची देशाची तयारी कमकुवत- Study)
या प्रकल्पाचे संस्थापक योगेश गावंडे यांनी मॅजिकच्या अमूल्य योगदानाबद्दल त्यांचे आभार मानले. गावंडे म्हणाले की, मॅजिकच्या मार्गदर्शन आणि पाठिंब्याशिवाय हे यश शक्य झाले नसते. गेल्या दोन वर्षांत, गेट्स फाउंडेशनच्या पाठिंब्याने, निओ फार्मटेकने उत्तर प्रदेश आणि ओडिशामध्ये मोठ्या प्रमाणात आपला विस्तार केला आहे, हजारो शेतकऱ्यांना नाविन्यपूर्ण कृषी उपाय प्रदान केले आहेत. महाराष्ट्र राज्य इनोव्हेशन सोसायटीनेही या प्रवासात त्यांना मदत केली आहे, असेही त्यांनी सांगितले.