
उन्हाळ्यात खूप उष्ण वारे वाहतात, परंतु जेव्हा एखाद्या ठिकाणाचे कमाल तापमान मैदानी भागात किमान 40 अंश सेल्सिअस किंवा त्याहून अधिक किंवा डोंगराळ भागात किमान 30 अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचते तेव्हा उष्णतेची लाट घोषित केली जाते. जागतिक तापमानवाढ आणि हवामान बदलामुळे उष्णतेच्या लाटा (Heatwave Threat) अधिक तीव्र आणि वारंवार होत आहेत, ज्यामुळे मानवी आरोग्य, पर्यावरण आणि अर्थव्यवस्थेवर गंभीर परिणाम होत आहेत. आता सस्टेनेबल फ्युचर्स कोलॅबोरेटिव्ह (SFC) ने वाढत्या उष्णतेच्या लाटेचा धोका असलेल्या शहरांबाबत अहवाल प्रसिद्ध केला आहे. या अहवालात हवामान बदलाशी संबंधित वाढत्या उष्णतेच्या लाटांबाबत मुंबईसह नऊ भारतीय शहरांबाबतच्या निष्कर्षांवर प्रकाश टाकण्यात आला आहे.
नवी दिल्ली येथील संशोधन संस्थेच्या सस्टेनेबल फ्युचर्स कोलॅबोरेटिव्हने केलेल्या संशोधनात, बेंगळुरू, दिल्ली, फरीदाबाद, ग्वाल्हेर, कोटा, लुधियाना, मेरठ, मुंबई आणि सुरत ही नऊ महत्त्वाची भारतीय शहरे अति उष्णतेच्या वाढत्या धोक्यांसाठी कशी सज्ज होत आहेत याचा तपास केला आहे. ही एकत्रितपणे भारतातील शहरी लोकसंख्येच्या 11 टक्क्यांहून अधिक आहेत आणि भविष्यातील उष्णतेसाठी भारतातील काही सर्वात धोकादायक शहरे आहेत. किंग्ज कॉलेज लंडन आणि हार्वर्ड युनिव्हर्सिटी सारख्या संस्थांसोबत केलेल्या या अभ्यासात, दिसून आले आहे की, भविष्यात वाढत्या उष्णतेच्या लाटांना तोंड देण्यासाठी भारताची तयारी कमकुवत आहे.
त्यात असा दावा करण्यात आला आहे की, देश प्रामुख्याने उष्णतेच्या लाटांना त्वरित प्रतिसाद देण्यावर लक्ष केंद्रित करत आहे, मात्र दीर्घकालीन रणनीतीवर अजूनही भर दिला जात नाही. अल्पकालीन उपाययोजना म्हणजे जीवनरक्षक कृती, तर दीर्घकालीन उपाययोजना म्हणजे आरोग्य व्यवस्था मजबूत करणे, क्षमता वाढवणे आणि भविष्यातील परिणाम कमी करण्यासाठी पर्यावरणीय पावले उचलणे.
साधारण 1.24 कोटी लोकसंख्या असलेल्या मुंबईवर लक्ष केंद्रित करून, अहवालात उष्णतेच्या लाटांची वारंवारता आणि तीव्रता वाढल्याचे सूचित केले आहे, जी गंभीर तापमान मर्यादा ओलांडत आहे. महाराष्ट्र राज्य उष्णता कृती आराखडा यासारख्या सध्याच्या उपक्रमांवर, दीर्घकालीन आव्हानांना तोंड देण्यासाठी प्रतिक्रियाशील आणि अपुरे असल्याची टीका केली जात आहे. डॉ. वाय. नितियानंदम यांनी शहरात वाढणाऱ्या उष्णतेसाठी वाहनांच्या उत्सर्जनाला जबाबदार ठरवत, हिरव्या जागा वाढवण्यावर भर दिला. (हेही वाचा: Maharashtra Weather Forecast: राज्यातील वाढत्या तापमानावर पावसाचा शिडकाव? गारपीटीसह पर्जन्यवृष्टीची शक्यता)
अहवालात अर्बन हीट आयलंड इफेक्टचा असुरक्षिततेमध्ये वाटा अधोरेखित करण्यात आला आहे आणि वनस्पती वाढीला प्राधान्य देण्याची तातडीची गरज यावर भर देण्यात आला आहे. बृहन्मुंबई महानगरपालिका उष्णतेशी संबंधित समस्यांना हायड्रेशन आणि संरक्षणात्मक उपायांबद्दल सल्ला देऊन सोडवत आहे. मात्र, दीर्घकालीन धोरणांशिवाय, उष्णतेच्या लाटा अधिक तीव्र झाल्यामुळे उष्णतेशी संबंधित मृत्यू वाढू शकतात. स्थानिक सरकारांना दीर्घकालीन उष्णतेसंबंधी कृती आराखडा स्वीकारण्याचे आणि असुरक्षित भागात आपत्ती व्यवस्थापन क्षमता सुधारण्याचे आवाहन केले जाते.