COVID 19 विरुद्ध लढताना पोलीस दलातील कर्मचाऱ्याचा मृत्यू झाल्यास सरकाकडून कुटुंबाला मिळणार 50 लाख रुपयांचे योगदान: अनिल देशमुख
Maharashtra Home Minister Anil Deshmukh (Photo Credits: ANI)

कोरोना व्हायरसच्या (Coronavirus) धोक्यामुळे राज्यभरात लॉक डाऊन (Lock Down)  जारी करण्यात आले आहे. यावेळी सुद्धा नागरिकांच्या सुरक्षेसाठी तत्पर असणारे पोलीस दलातील (Maharashtra Police) कर्मचारी ऑन ड्युटी आहेत. अनेकदा या कर्मचाऱ्यांना जीव धोक्यात घालून वावरावे लागते. अशावेळी जर का कोरोना विरुद्ध लढा देताना ऑन ड्युटी असलेल्या पोलिसांचा जर का मृत्यू झाला तर त्यांच्या मागे असणाऱ्या त्यांच्या कुटुंबासाठी मदत म्ह्णून सरकारकडून तब्बल 50 लाख रुपयांचे मदतपर अनुदान देण्यात येणार आहे. याबाबत राज्य गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh)  यांनी ट्विट च्या माध्यमातून घोषणा केली आहे. याशिवाय मागील काही काळात सरकारी कर्मचाऱ्यांचे पगार टप्प्या टप्प्यात देण्यात येतील असे सांगण्यात आले होते मात्र याचा फटका पोलिसांनी बसणार नाही त्यांचे पगार हे प्राधन्याने दिले जातील असेही अनिल देशमुख यांनी म्हंटले आहे. (हेही वाचा, Coronavirus: मुंबई विमानतळावरील CISF चे 11 जवान COVID-19 पॉझिटीव्ह, BMC कर्मचाऱ्यालाही कोरोना व्हायरस बाधा)

अनिल देशमुख यांनी ट्विटच्या माध्यमातून पोलिसांच्या अहोरात्र मेहनतीचे कौतुक करत, सर्व पोलीस यंत्रणेच्या कामाचा मला गर्व आहे, असेही म्हंटले आहे. तसेच पोलीसांवर व आरोग्य कर्मचाऱ्यांवर हल्ले होत असेल तर हल्लेखोरांचा समाचार योग्य पध्दतीने घेतला जाईल, अशाही इशारा त्यांनी दिला आहे. पोलिसांना कोरोनाच्या भीतीपेक्षा नागरिकांना सांभाळण्याचे मोठे कष्ट पडत आहेत. नागरिकांनी त्यांना सहकार्य करणे अपेक्षित आहे असे अनिल देशमुख यांनी म्हंटले आहे.

अनिल देशमुख ट्विट

दरम्यान, महाराष्ट्रातील कोरोनाचे संकट सध्या वेगाने पसरत चालले आहे. आज सुद्धा मुंबई,पुणे, ठाणे जिल्ह्यातून कोरोनाच्या 47 नव्या रुग्णांची नोंद झाली आहे, यासोबतच राज्यातील कोरोनाग्रस्तांचा आकडा 537 वर पोहचला आहे. आज याबाबात माहिती देताना आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सुद्धा 15 एप्रिल पर्यंत जर का राज्यातील परिस्थिती नियंत्रणांत आली नाही तर लॉक डाउनचा कालावधी वाढवला सुद्धा जाईल असा इशारा दिला आहे.