राज्यासह देशभरात कोरोना व्हायरस (Coronavirus) संसर्गाने हाहाकार उडवला आहे. त्यामुळे राज्यभर कोरोना व्हायरस ( COVID 19) संसर्गामुळे होणाऱ्या मृत्यूची चर्चा आहे. दरम्यान, या मृत्यूत आता सारी (Sari Disease) आजाराने होणाऱ्या मृत्यूचीही भर पडत आहे. प्रामुख्याने जळगाव (Jalgaon District) जिल्ह्यात सारी आजार आपले हातपाय पसरत असल्याचे पुढे येत आहे. जळगाव जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. नागोजी जव्हाण यांच्या हवाल्याने प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तात सारी आजाराबाबत चिंता व्यक्त केली आहे. कोरोना महामारी काळात जळगव जिल्ह्यात झालेल्या एकूण मृत्यूपैकी 25% ते 30% मृत्यू हे सारी आजारामुळे झाले आहेत.
कोरोना हा आजार अलिकडील काही दिवसांमध्ये आला आहे. कोरोनाचा उगम हा साधारण सन 2020 च्या सुरुवातीला किंवा सन 2019 च्या अखेरीस झाला असे सांगितले जाते. दरम्यान, या आजाराने अवघ्या जगाला वेटीस धरले आहे. महाराष्ट्रात कोरोना व्हायरस संक्रमित रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढते आहे. त्यासोबतच कोरोना व्हायरस संसर्गामुळे मृत्यू झालेल्यांचा आकडाही मोठा आहे. असे असले तरी सारी हा मात्र जुनाच आजार आहे. या आधीही सारी आजारामुळे अनेकांचे प्राण घेतले आहेत.
सारी आजाराची लक्षणे
- श्वसन विकार
- न्युमोनिया
- टीबीची लक्षणं
- फुफ्फुसाला इंफेक्शन
- शरीराती ऑक्सिजन पातळीत घट
सारी आजार आणि कोरोना या दोन्ही आजारांची लक्षणे कमी अधिक प्रमाणात सर्वसाधारण सारखीच असतात. दोन्ही आजारांमध्ये सुरुवातीला सर्दी, खोकला असा साधारण त्रास होतो. नंतर हाच त्रास वाढत पुढे न्युमोनिया आजारात परावर्तीत होतो. ज्यामुळे फुफ्फुसात संसर्ग होतो. त्यामुळे रुग्णाला श्वसनाचा त्रास जाणवतो. श्वसनास त्रास झाल्याने रुग्ण पुरेशा प्रमाणात श्वास घेऊ शकत नाही. परिणामी शरीरातील ऑक्सिजनची पातळी कमी होते. ही पातळी अधिक मोठ्या प्रमाणावर घटली असता रुग्णाचा मृत्यू देखील होतो.
दरम्यान, कोरोना आणि सारी या दोन्ही आजारांची लक्षणे सारखीच आहेत. त्यामुळे दोन्ही आजारांवरील उपचारपद्धतीही सारखीच असल्याचे वैद्यकीय क्षेत्रातील जाणकार सांगतात. दोन्ही आजारांमध्ये रुग्ण जर वेळेत रुग्णालयात दाखल झाला. त्याच्यावर योग्य वेळी उपचार झाले तर रुग्ण ठणठणीतपणे बरा होतो.