Bombay High Court Upholds Renaming Of Aurangabad, Osmanabad: औरंगाबाद आणि उस्मानाबाद च्या नामांतरावर मुंबई उच्च न्यायालयाचे शिक्कामोर्तब
Bombay High Court | (Photo Credits: ANI)

शिंदे फडणवीस सराकारने महाराष्ट्रात औरंगाबाद (Aurangabad) चं नामांतर छत्रपती संभाजीनगर (Chatrapati Sambhajinagar) आणि उस्मानाबाद (Osmanabad) चं नामांतर धाराशिव (Dharashiv) करण्याच्या निर्णयावर आज मुंबई उच्च न्यायालयाने शिक्कामोर्तब केले आहे. कोर्टाने केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या निर्णयाला स्थानिक रहिवाशांनी दिलेलं आव्हान फेटाळलं आहे. ऑक्टोबरमध्ये राखून ठेवलेला निर्णय अखेर आज कोर्टाने जाहीर केला आहे. मुख्य न्यायमूर्ती देवेंद्रकुमार उपाध्याय आणि न्यायमूर्ती आरीफ डॉक्टर यांच्या खंडपीठाने हा निकाल दिला आहे.

राज्य सरकारने महसूल विभागाच्या अंतर्गत येणाऱ्या भागात उस्मानाबाद आणि औरंगाबाद यांची नावं बदलून आता धारशिव आणि छत्रपती संभाजीनगर केल्याचा निर्णय योग्य असल्याचं म्हटलं आहे. या निर्णयामुळे कोणालाही फरक पडणार नाही असं म्हणत याचिका फेटाळल्या आहेत. या याचिका फेटाळताना हायकोर्टाने कोणताही आर्थिक दंड लावलेला नाही. Aurangabad became Chhatrapati Sambhajinagar: औरंगाबाद शहर आता छत्रपती संभाजीनगर; उस्मानाबादचे झाले धाराशिव, मुख्यमंत्र्यांच्या हस्ते नामफलकाचे अनावरण .

याचिका कर्त्यांनी आपण उच्च न्यायालयाच्या निकालाला आता सर्वोच्च न्यायालयामध्येही आव्हान देणार असल्याचं म्हटलं आहे. यासंदर्भात आलेल्या 28 हजार आक्षेप अर्जांचा विचार न करता केवळ राजकीय हेतूनेच हा निर्णय घेण्यात आला असल्याचं याचिका कर्त्यांचं म्हणणं आहे. दरम्यान महाराष्ट्र सरकार साठी हा निर्णय अत्यंत महत्त्वाचा आणि दिलासा देणारा आहे. भविष्यात आता अहमदनगर देखील अहिल्यानगर होणार असल्याची घोषणा काही दिवसांपूर्वी देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.

माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या महाविकास आघाडी सरकारने जून 2022 मध्ये आपल्या शेवटच्या मंत्रिमंडळ बैठकीत औरंगाबादचे संभाजीनगर आणि उस्मानाबाद शहराचे नाव धाराशिव असे करण्यास हिरवा झेंडा दाखवला होता मात्र, त्यानंतरच्या शिंदे-फडणवीस सरकारने नाव बदलण्याचा नवा निर्णय घेऊन औरंगाबादचे नाव बदलून छत्रपती संभाजीनगर असे नामकरण करून ‘छत्रपती’ हा शब्द जोडला.