Aurangabad became Chhatrapati Sambhajinagar | (Photo credit: archived, edited, representative image)

Usmanabad became Dharashiv: औरंगाबाद (Aurangabad ) आणि उस्मानाबाद या दोन्ही जिल्ह्याची नावे अनुक्रमे छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhajinagar) आणि धाराशिव असे बदलण्यात आले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील महाराष्ट्र सरकारने याबाबत अधिसूचना जारी केली आहे. तसेच मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री अजित पवार, देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत जिल्ह्यांच्या महसूली नावात बदल झाल्याच्या नामफलकाचे अनावरणही करण्यात आले. काही महिन्यांपूर्वी मागवलेल्या सूचना आणि हरकतींवर विचार करण्यात आला असून उपविभाग, गाव, तालुका आणि जिल्हा स्तरावर नावे बदलण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे महसूल विभागाने शुक्रवारी रात्री जारी केलेल्या अधिसूचनेत म्हटले आहे.

तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या शेवटच्या मंत्रिमंडळ बैठकीत औरंगाबाद आणि उस्मानाबादचे नाव बदलण्याचा निर्णय मागील महाविकास आघाडी (MVA) सरकारने राजीनामा देण्यापूर्वी 29 जून 2022 रोजी घेण्यात आला होता. दरम्यान, नव्याने सत्तेत आलेल्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारने सत्तेत आल्यानंतर अवघ्या एकच दिवसांमध्ये नामांतर करण्याचा ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील सरकारचा निर्णय बेकायदेशीर असल्याचे म्हटले होते. राज्यपालांनी राज्यात बहुमत सिद्ध करण्यास सांगितल्यानंतर त्यांनी हा निर्णय घेतला होता, असे त्यावेळी सरकारच्या (शिंदे) वतीने सांगण्या आले. त्यानंतर शिंदे सरकारने औरंगाबाद आणि उस्मानाबाद शहरांचे अनुक्रमे छत्रपती संभाजीनगर आणि धाराशिव असे नामांतर करण्यास मंत्रिमंडळाने गेल्या वर्षी जुलैमध्ये विधानसभेत मान्यता दिली.

दरम्यान, महाराष्ट्र शासनाच्या महसूल विभागाने प्रसिद्ध केलेल्या राजपत्रात महसूल विभाग महसुली क्षेत्रांची नावे बदलत असल्याचे नमूद केले होते. त्यानुसार औरंगाबाद जिल्ह्याला छत्रपती संभाजीनगर जिल्हा असे संबोधण्यात येणार आहे. औरंगाबाद शहराला छत्रपती संभाजीनगर शहर म्हटले जाईल. औरंगाबाद तालुक्याला छत्रपती संभाजीनगर तालुका म्हटले जाईल. मराठवाडा हा प्रशासकीय आणि महसुली विभाग आहे. जिथे नवीन नावे मिळालेली दोन्ही शहरे वसलेली आहेत. हा विभाग आणि उपविभाग पूर्वी औरंगाबाद आणि उस्मानाबाद या नावांनी ओळखला जात असे. त्याला आता नव्या नावांनी संबोधले जाईल, असे सरकारद्वारा प्रसिद्ध अधिसूचनेत म्हटले आहे. छत्रपती संभाजीनगर विभाग आणि छत्रपती संभाजीनगर उपविभाग अशी नवीन नावे असतील. तसेच उस्मानाबादचा जिल्हा, तालुका, शहर व उपविभागाला आता धाराशिव जिल्हा, धाराशिव तालुका, धाराशिव शहर आणि धाराशिव उपविभाग असे संबोधण्यात येणार आहे.