Shiv Sena MLA Disqualification Case: शिवसेना (Shiv Sena) आमदार अपात्रता प्रकरणी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी आज सुनावणी घेतली. सुनावणी दरम्यान कागदपत्रे सादर करण्यासाठी त्यांनी शिंदे गटाला आणि पर्याने ठाकरे गटालाही दोन आठवड्यांची मुदत वाढवून दिली. त्यामुळे ही सुनावणी पुढे ढकलण्यात आली. यावर उद्धव ठाकरे गटाचे वकील असिम सरोदे (Asim Sarod) यांनी प्रसारमाध्यमांसमोर स्पष्टच भूमिका मांडली आहे. शिवसेना पक्षातून बाहेर पडलेल्या 16 आमदारांना अपात्र ठरविण्याबद्दल सर्वोच्च न्यायालयाचे स्पष्ट निर्देश आहेत. असे असले तरी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर (Rahul Narvekar) केवळ वेळ मारून नेण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यांना वरुन काही सूचना आल्या असव्यात. त्यामुळेच ते वेळ मारुन नेत असावेत, असे सरोदे यांनी म्हटले आहे.
सर्वोच्च न्यायालयाने 16 आमदारांच्या अपात्रेबद्दल स्पष्ट निर्देश दिले आहेत. असे असताना शिंदे गटाकडून केवळ जाणूनबूजून विलंब लागावा यासाठी आयडिया केली जात आहे. त्यात विधानसभा अध्यक्षही वेळ मारुन नेण्याचा प्रयत्न करत असावेत. सातत्याने काहीतरी कारणं दिली जातात आणि प्रकरण लांबणीवर पडते आहे. वरुन कोणाच्यातरी सूचना आल्यानेच हा प्रकार सुरु असावा असे सरोदे यांनी म्हटले आहे. (हेही वाचा, Shiv Sena MLA Disqualification Case: शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणात मोठी अपडेट, काय घडलं सुनावणी वेळी?)
विधानसभा अध्यक्षांकडे दाखल असलेल्या एकूण 40 याचिकांवर सुनावणी होऊन एकत्र निर्णय घेण्यात यावा, अशी आमची मागणी आहे. महत्त्वाचे म्हणजे या सर्व याचिकांचे विषय एकच आहेत. त्यामुळे या याचिकांवर एकत्र सुनावणी घेण्यात यावी. ही सुनावणी एकत्रच चालवली जावी, अशीही आमची मागणी आहे. पण अध्यक्ष वेळ मारुन नेत आहेत. खरे तर पक्षादेश झुगारून पक्षातून बाहेर पडलेले काही आमदार सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार पाहता आगोदरच अपात्र ठरले आहेत. आता अध्यक्षांना केवळ त्या निर्देशाचे पालन करायचे आहे, असेही असिम सरोदे यांनी म्हटले आहे.