Bandra Worli Sea Link Accident: सी लिंकवरील भीषण अपघातामधील चालकाला एक दिवसाची कोठडी; MSRDC घेणार सुरक्षा उपायांचा आढावा
Image of Bandra Worli Sea Link in Mumbai (Image Credit: Facebook/BWSL.Mumbai)

महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ (MSRDC) मुंबई वाहतूक पोलिसांसह सी लिंकच्या (Bandra Worli Sea Link) विद्यमान सुरक्षा उपायांचे आणि आवश्यक असल्यास अतिरिक्त प्रोटोकॉलचे पुनरावलोकन करेल. नुकतेच सी लिंकवर झालेल्या भीषण अपघाताच्या पार्श्वभूमीवर हे पाऊल उचलण्यात आले आहे. याशिवाय अशा प्रकारची दुर्घटना टाळण्यासाठी काय केले पाहिजे याचाही शोध घेतला जाणार आहे. बुधवारी पहाटे सी लिंकवर भरधाव वेगाने येणा-या कारने रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या वाहनांना जोरदार धडक दिली. या अपघातात गाड्या एकमेकांवर आदळल्या.

घडलेल्या अपघातामध्ये 5 जणांचा मृत्यू झाला आहे. या पाच जणांचा बळी घेणार्‍या आरोपीचे नाव इरफान अब्दुल रहीम बीलकिया (42, मोहम्मद अली रोड येथील रहिवासी आणि रिअल इस्टेट डेव्हलपर) असे असून, पोलिसांनी त्याला कलम 304 अंतर्गत अटक केली आहे. त्याला ओव्हर स्पीडिंग आणि रॅश ड्रायव्हिंगसाठी ताब्यात घेण्यात आले आहे. याप्रकरणी गुरुवारी पोलिसांना एक दिवसाची कोठडीही मिळाली आहे. चौकशीमध्ये मोबाईल चार्जिंग कॉर्ड जोडण्याचा प्रयत्न करत असताना त्याचे लक्ष विचलित झाल्याने हा अपघात घडला असे त्याने सांगितले.

एकूण मृतांपैकी चार टोल प्लाझा कर्मचारी होते तर एक रुग्णवाहिका चालक होता. अपघाताबाबत एमएसआरडीसीचे सह व्यवस्थापकीय संचालक संजय यादव म्हणाले, अपघात पाहिला तर घटनास्थळी टोइंग वाहन व रुग्णवाहिका होती, बॅरिकेडिंगही करण्यात आले होते, येणाऱ्या वाहनांना मार्गदर्शन करण्यासाठी ट्रॅफिक मार्शल होते. असे असताना हा अपघात घडला त्यामुळे कोणत्या भागामध्ये काही दोष आहे का हे शोधण्यासाठी आम्ही पुढील तपासात जाऊ. (हेही वाचा: BEST ऑक्टोबरच्या मध्यापर्यंत प्रीमियम बससेवा करणार सुरू, अशाप्रकारे तिकीट बुक करता येईल)

सी लिंकच्या ऑपरेशन आणि देखभालीची जबाबदारी असलेल्या पूर्वीच्या टोल ऑपरेटरची बदली दुसर्‍या कंपनीने केली असली तरी, इथला ग्राउंड स्टाफ मात्र तोच आहे, ज्यांना 5.6 किमी लांबीचा सागरी पुलावरील काम सुरळीत चालण्यासाठी आवश्यक असलेल्या मानक कार्यपद्धती तसेच प्रोटोकॉलची माहिती आहे. दुसरीकडे, आरोपीच्या वाहनातील यांत्रिक दोषांची पुष्टी करण्यासाठी आरोपीची कार फॉरेन्सिक चाचणीसाठी पाठविण्यात आली आहे, तर आरोपीची अल्कोहोल चाचणी देखील सुरू आहे आणि या प्रकरणातील इतर तपास सुरू आहेत.