काँग्रेस (Congress) पक्षाचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांनी पक्षाच्या विधिमंडळ पक्षनेते पदाचा राजीनामा (Balasaheb Thorat Resignation) दिल्याचे समजते. बाळासाहेब थोरात हे केवळ काँग्रेस पक्षातीलच नव्हे तर, विधिमंडळातीलसुद्धा ज्येष्ठ सदस्य आहेत. त्यामुळे त्यांच्या राजीनाम्यामुळे महाराष्ट्र काँग्रेसच्या (Maharashtra Congress) गोटात खळबळ उडाली आहे. शिक्षक आणि पदवीधर निवडणुकीत काँग्रेस पक्षात घडलेल्या घडामोडींनी व्यथित झाल्याने थोरात यांनी राजीनामा दिल्याची प्राथमिक माहिती आहे. पक्षश्रेष्ठी बाळासाहेब थोरात यांचा राजीनामा स्वीकारणार का? याबाबत उत्सुकता आहे.
बाळासाहेब थोरात यांनी नाशिक पदविधर मतदारसंघाचा निकाल लागला त्याच दिवशी आपली नाराजी व्यक्त केली होती. त्यांनी याबाबत एक अहवालही हायकमांडकडे पाठवल्याचे समजते. त्यामुळे हायकमांड आता थोरात यांची मनधरणी करणार की पक्षात नवे धोरण अवलंबणार याबाबत उत्सुकता आहे. पदविधर मतदारसंघ निवणुकीत खास करुन नाशिक पदवीधर मतदारसंघात झालेल्या निवडणुकीत काँग्रेस पक्षात बऱ्याच घडामोडी घडल्या. पक्षांतर्गत कलह, संघर्ष आणि शह-काटशहाचा पूरेपूर प्रयत्न या निवडणुकीत पक्षांतर्गत झाला. त्यातून सत्यजित तांबे या युवक काँग्रेसचा अध्यक्ष राहिलेल्या नेत्यावर निलंबनाची कारवाई झाली. या सर्व घडामोडींवर बाळासाहेब थोरात यांनी सूचक मौन बाळगले होते. जे त्यांनी थेट निकालाच्या दिवशीच सोडले. (हेही वाचा, Maharashtra Politics: बाळासाहेब थोरात यांनी प्रदेश काँग्रेस अध्यक्ष नाना पटोले यांच्यासोबत काम करण्यास दाखवली असमर्थता)
दरम्यान, बाळासाहेब थोरात यांनी कोणत्याही प्रकारे वेगळे पाऊल उचलू नये यासाठी पक्षाचे (कँग्रेस) नेतृत्व प्रयत्नशील असल्याचे समजते. दुसऱ्या बाजूला थोरात यांची मनधरणी करण्याचेही प्रयत्न सुरु असल्याचे बोलले जात आहे. मात्र, बाळासाहेब थोरात अद्याप तरी राजीनाम्यावर ठाम असल्याचे समजते. शिवाय हायकमांडला लिहिलेल्या पत्रात आपण राजीनामा दिला असला तरी यापुढेही काँग्रेसच्या विचारांनीच पुढे जाणार असल्याचे थोरात यांनी म्हटल्याचे दिल्लीतील सूत्रे सांगत आहेत.